अखेर म्हापसा पालिकेचे कामगार रुजू

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी
म्हापसा : अनियमित वेतन आणि पगारवाढ होत नसल्यामुळे म्हापसा नगरपालिकेच्या रोजंदारी कामगारांनी कामावर बहिष्कार टाकला होता. पालिकेचे मुख्याधिकारी कबीर शिरगांवकर यांनी त्यांची समजूत काढली आणि नियमित पगार देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर कामगार गुरुवारी दुपारपासून पुन्हा कामावर रुजू झाले.
नियमित वेतन व पगारवाढ देण्याच्या मागणीसाठी बुधवारी सुमारे 200 कर्मचार्यांनी पालिका कार्यालयाच्या आवारात ठिय्या मांडला होता. गुरुवारी सकाळीही कामावर बहिष्कार टाकून कामगारांनी पालिका कार्यालयाच्या आवारात ठिय्या मांडला. पालिका अभियंता व कनिष्ठ अभियंत्यांनी या कामगारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण जोपर्यंत मुख्याधिकार्यांकडून ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत कामावर रुजू न होण्याचा पवित्रा घेत अधिकार्यांची विनंती फेटाळून लावली होती.
मुख्याधिकार्यांनी केली शिष्टाई
त्यानंतर दुपारी मुख्याधिकारी कबीर शिरगांवकर यांनी आपल्या केबिनमध्ये कामगारांसोबत बैठक घेतली व त्यांचे गार्हाणे ऐकून घेतले. वेळेवर पगार घातला जात नाही, पगार 10 ते 15 तारखेच्या दरम्यान घातला जातो. हा पगार 7 ते 8 तारखेच्या अगोदर घालावा. वाढत्या महागाईत ही रोजंदारी परवडत नाही. त्यामुळे त्यात वाढ करावी, अशी मागणी कामगारांनी मुख्याधिकार्यांकडे केली.
आश्वासनानंतर कामावर रुजू
प्रति महिना 7 ते 8 तारखेला वेतन घातले जाईल. पगारवाढ करण्याचा अधिकार पालिकेला नसून सरकारला आहे. त्यामुळे रोजंदारी वाढीबाबत सरकारकडे प्रस्ताव पाठविला जाईल, असे आश्वासन मुख्याधिकारी शिरगांवकर यांनी कामगारांना दिले. त्यानंतर दुपारपासून सर्व कामगार कामावर रुजू झाले.
आंदोलनामुळे कचरा साचला
पगारासाठी कामावर बहिष्कार टाकलेले सर्व कामगार कचरा उचलणारे होते. हे कामगार संपावर गेल्याने घरोघरी तसेच मार्केटसह शहरात सर्वत्र कचराच कचरा झाला होता. लोकांच्या घरांमध्ये कचर्यामुळे दुर्गंधी पसरली होती. अधिकार्यांना लोकांकडून फोन येऊ लागले. त्यामुळे सकाळी कार्यालयीन कर्मचार्यांना कचरावाहू गाड्यांवर तैनात करून अधिकार्यांना काम उरकून घ्यावे लागले. रोजंदारी कामगारांचा प्रश्न सुटल्याने या कर्मचार्यांनी सुटकेचा श्वास घेतला.