म्हापसा पालिकेची कचरावाहू वाहने नादुरुस्त

कचरा संकलनावर विपरित परिणाम : सरकारकडून मिळालेले वाहन नोंदणी प्रक्रियेनंतर येणार सेवेत

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसाः येथील पालिकेच्या पाच कचरावाहू गाड्या नादुरुस्त स्थितीत पडल्या आहेत. बंद पडलेल्या या गाड्यांकडे पालिका मंडळाने दुर्लक्ष केल्याने शहरातील कचरा गोळा योजनेवर विपरीत परिणाम झाला आहे.

हेही वाचाः भू रूपांतर जनहित याचिकेची अंतिम सुनावणी २८ रोजी

कचरा गोळा करण्यासाठी पालिकेकडे १२ कचरावाहू वाहने

कचरा गोळा करण्यासाठी पालिकेकडे १२ कचरावाहू वाहने आहेत. यातील एक कॉम्पेक्टर, तीन रिक्षा व एक महिंद्रा टेम्पो अशा पाच गाड्या बंद आहेत. वारंवार टायर पंक्चर होणे व इतर बिघाडामुळे ही नादुरुस्त झालेली कचरावाहू वाहने पालिकेवर बंद ठेवण्याची पाळी ओढवली आहे.
दोन वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या तीन रिक्षा व महिंद्रा टेम्पो महिन्याभरापासून नादुरुस्त होऊन पडल्या आहेत. तर कचरावाहू कॉम्पेक्टर गेल्या पाच दिवसांपासून बंद ठेवण्यात आला आहे.

देखभालीअभावी वाहने नादुरुस्त

देखभालीअभावी प्रत्येक फेरीवेळी या वाहनांचे टायर पंक्चर होण्याचा प्रकार घडत आहे. यामुळे कचरा गोळा सेवेवर परिणाम झाला आहे. सध्या कार्यरत असलेली सात वाहनेदेखील अशाच प्रकारे नादुरुस्त झाल्यास ऐन चतुर्थीच्या सणावेळी पालिकेची कचरावाहू योजनाच ठप्प होण्याची भीती कर्मचारिवर्गाने व्यक्त केली आहे.

म्हापसा परिसरात एकही गॅरेज नाही?

पालिकेने आपली वाहने दुरुस्त करण्यासाठी होंडा – सत्तरी येथे एका गॅरेजची नियुक्ती केलेली आहे. ही गॅरेज चाळीस किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे नादुरुस्त वाहने या गॅरेजमध्ये वेळीच पाठविणे शक्य होत नाही व ये जा करण्यासाठी बरीच कालावधी लागते. ही पाचही नादुरुस्त वाहने गॅरेजमध्ये पाठविण्यात न आल्याने ती दुरुस्तीअभावी पडून आहेत.

हेही वाचाः बाधिताचा ३० दिवसांत मृत्यू झाल्यास ठरणार करोनाबळी

रोजंदारीवर असलेल्यांची मजा, नियमित असलेल्यांना सजा

म्हापसा पालिकेचे रोजंदारी कामगार शनिवार रविवारच्या दिवशी कामाला दांडी मारत आहेत. हे कामचुकार कामगार कुठे जातात हे कुणालाच कळत नाही. तरीही त्यांना पालिकेकडून कोणतीही समज दिली जात नाही. पण वरील सुट्टीच्या दिवशी पालिकेकडून कायमस्वरूपी कामगारांना ड्यूटीवर येण्यास भाग पाडले जात असून पालिकाधिकार्‍यांकडून चालविलेल्या या प्रकारावर कामगारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कचरा शुल्काची वसुली हे शिपायाचे काम?

पालिका कार्यालयातील एका शिपायाला (प्यून) थेट कचरा शुल्क वसूल करण्याच्या कामी जुंपण्याचा प्रकार पालिकेने चालविला आहे. पालिकेतील एक अधिकारी आपल्या कॅबिनमध्ये बसत नाही, ते दुसर्‍या अधिकार्‍याच्या कॅबिनमध्ये बसून आपले कामकाज हाताळतात. त्यांच्या कॅबिनमध्ये सेवा बजावणार्‍या या शिपायाला मार्केटमधील व्यावसायिकांकडून कचरा शुल्क वसूल करण्याचे काम सोपविले आहे. हे काम त्या कर्मचार्‍याचे नाही, तरीही अधिकार्‍यांच्या धाकामुळे त्यांना ही सेवा बजावावी लागत आहे.

कचरावाहू वाहनांमध्ये जास्त प्रमाणात कचरा भरल्यामुळे ही वाहने नादुरुस्त होत आहेत. सरकारने पालिकेला नवीन कचरावाहू वाहन दिले असून त्याबाबतची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. लवकरच हे वाहनदेखील सेवेत रुजू होईल, असं नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांनी सांगितलंय.

हा व्हिडिओ पहाः Mopa Link Road Agitation | मोपा लिंक रोड पिडितांची आर्त हाक

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!