गोव्यात 10 ते 15 दिवस कडक लॉकडाऊन कराच

बार्देशमधील वकिलांची सरकारकडे निवेदनाद्वारे मागणी

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसाः कोरोनाने राज्यात थैमान मांडलं आहे. हा वाढता उद्रेक पाहता सरकारने राज्यात 10 ते 15 दिवस कडक लॉकडाऊन पुकारण्याची गरज आहे. लॉकडाऊन लागू करून आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत लोकांचे प्राण वाचविण्यासाठी त्वरित मदतवजा उपाय योजनांची अंमलबजावणी करावी, अशी लिखित मागणी बार्देश तालुक्यातील वकीलांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे.

हेही वाचाः दोडामार्गमध्ये होणार कडक लॉकडाऊन!

वकिलांकडून सरकारल निवेदन

अ‍ॅड. श्रीधर कामत यांनी सहकारी वकीलांमार्फत मुख्यमंत्री तसंच मुख्य सचिवांना वरील मागणीचं निवेदन मंगळवारी पाठवलं. निवेदनावर अ‍ॅड. व्हिक्टर ब्रागांझा, अ‍ॅड. विलास पाटकर, अ‍ॅड. ए.बी. ब्रागांझा, अ‍ॅड. शंकर फडते, अ‍ॅड. मार्क लोबो, अ‍ॅड. जेरी सांतामारीया, अ‍ॅड. प्रभाकर नारूलकर आमि इतर वकिलांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

हेही वाचाः LOCKDOWN | मांद्रे पंचायतीकडून सेल्फ लॉकडाऊन जाहीर

कोरोना व्यवस्थापनात सरकार पडतंय अपुरं

गोव्यातील करोना बाधितांचा दर देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वांधिक आहे. तसंच गोव्यात कोविड मृतांची संख्या दिवसाला 50 वर येऊन पोहोचली आहे. त्यामुळे आपलं राज्य आपत्ती व्यवस्थापनात अपयशी किंवा अपुरं पडत असल्याचं दिसून येत आहे, असं म्हणायला आम्हाला अजिबात संकोच वाटत नाही, अशा शब्दांत वकिलांनी राज्याच्या प्रशासकीय कारभारावर टीका केली आहे. करोना महामारीला आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत यापूर्वीच राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्यात आलं आहे. या आपत्तीचा सामना करण्यासाठी योग्य नियोजन करून त्याची अंमलबजावणी करण्याचं आपलं कर्तव्य आहे. याची जाणीव मुख्यमंत्री व मुख्य सचिवांना करून देण्याचा प्रयत्न वकिलांनी निवेदनातून केला आहे.

10 ते 15 दिवसांचा संपूर्ण कडक लॉकडाऊन हवाच

 लोकांचं आरोग्य आणि जीवापेक्षा अर्थव्यवस्थेला जास्त महत्व दिलं जात आहे, जी खूपच दुर्दैवी बाब आहे. कोरोना महामारीमुळे आमचे जवळचे वकील मित्र, शेजारी, सहयोगी किंवा इतर गोंयकारांच्या निधनाचं वृत्त ऐकून आम्हाला खूप वेदना होत आहेत. अशा स्थितीही सरकारला संपूर्ण लॉकडाऊन कशासाठी अनुकूल वाटत नाही, असा प्रश्न वकिलांनी निवेदनातून सरकारला केलाय. आम्हाला आमचे सहयोगी, नातेवाईक तसंच लोकप्रतिनिधींच्या आरोग्याची काळाजी असून मानवतेच्या दृष्टीकोनातून राज्यात किमान 10 ते 15 दिवसांचा संपूर्ण कडक लॉकडाऊनची मागणी आम्ही सरकारकडे करीत आहोत. जेणेकरून लोकांचा जीव वाचवता येईल. सरकारने आताच योग्य अशी कारवाई न केल्यास भविष्यात आम्ही संपूर्ण लॉकडाऊनसाठी इच्छुक असू. पण त्यानंतर लॉकडाऊनदेखील आम्हाला वाचवू शकणार नाही, अशी चिंता या वकिलांनी व्यक्त केली आहे. सरकारने आतातरी सकारात्मक विचार करावा आणि लॉकडाऊन लागू करावं, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!