कोकणीचा परिमळ जगभर पसरविणारे तियात्रिस्त एम. बॉयर

तियात्रिस्त एम. बॉयर म्हणजेच मान्युएल सांतान आगीयार यांचा 11 ऑक्टोबर हा जन्मदिन. तियात्राच्या माध्यमातून गोव्यात जनजागृती करताना एम. बॉयर यांनी तियात्र जगभर नेलं. त्यांच्याविषयी...

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : तियात्र हा गोव्याच्या कोकणी साहित्य आणि रंगभूमीचा अविभाज्य घटक. 35 हून अधिक तियात्र लिहिणारे गोव्याचे सुपुत्र मान्युएल सांतान आगीयार म्हणजेच एम. बॉयर. 11 ऑक्टोबर 1930 रोजी जन्माला आलेल्या या अवलियानं आपल्या कलेच्या माध्यमातून कोकणीचा परिमळ जगभर पसरवला.

आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी तियात्राचे 5 हजारहून अधिक प्रयोग केले. तसेच 1 हजारच्या आसपास गाणी म्हटले. रंगभूमीला वाहून घेतलेल्या एम. बॉयर यांना 2005 साली पद्मश्री पुरस्कारानं गौरविण्यात आलं. 1994-95मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीचा मानाचा पुरस्कार देण्यात आला. हे दोन्ही पुरस्कार मिळविणार्‍या मोजक्याच कलाकारांच्या यादीत एम. बॉयर यांचा समावेश होतो. 1984-85 साली त्यांना गोवा राज्य सांस्कृतिक पुस्काराने गौरविण्यात आले.

मडकई इथं बालपण गेलेले एम. बॉयर नंतर राय इथं वास्तव्य करून राहिले. रिणकारी हा तियात्र त्यांनी वयाच्या अठराव्या वर्षी लिहिला. पुढे तियात्र हेच त्यांचं भावविश्व बनलं आणि अनेक तियात्रांच्या माध्यमातून त्यांनी व्यवस्थेतील फोलपणा समोर आणला. काही तियात्रांतून त्यांनी जनजागृतीही केली. मुंबई, मेंगलोर, दिल्ली तसेच आखाती देशांतही त्यांनी तियात्र पोहोचवला. एकूच रोस्तो हा तियात्र जनजागृतीसाठी गोवा सरकारने पुरस्कृत केला होता. त्यांच्या तियात्रांना गोव्यात मोठा प्रेक्षकवर्ग लाभला. कोकणी भाषा हाच गोव्याच्या वेगळेपणाची ओळख ठरू शकते, यावर त्यांचा ठाम विश्वास होता.

संसार सुदोरलो, घोर दुखी गांव सुखी, मोग, काजार, डायव्होर्स ही त्यांची काही गाजलेली तियात्र. सामाजिक सलोखा, नैतिकता आणि शांतता याचा त्यांनी तियात्रातून नेहमीच आग्रह धरला.

30 मे 2009 रोजी त्यांचं निधन झालं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!