मांगेलीत भीती ‘माळीण’ची…

अतिवृष्टी व वृक्षतोड यामुळं डोंगराला भेगा

संदिप देसाई | प्रतिनिधी

दोडामार्ग : कर्नाटक बॉर्डरवरुन फेसाळणारा धबधबा आणि खचाखच भरलेल्या नैसर्गिक सौंदर्यामुळे सर्वदूर परिचित झालेल्या मांगेली गावाला आता वेगळ्याच समस्येने ग्रासले आहे. मांगेलीत फणसवाडी येथे डोंगर खचल्याने तेथे भूस्खलन होण्याची दाट भीती व्यक्त केली जात आहे. सरपंच व ग्रामस्थांनी लक्ष वेधल्यानंतर दोडामार्ग पंचायत समितीचे सदस्य व शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी गंभीर दखल घेत महसूल यंत्रणा व भूवैज्ञानिक यांना घेत आज डोंगर खचला त्याची संयुक्त पाहणी केली आहे. सदर भूस्खलन हे अतिवृष्टी तसेच इथे झालेल्या बेसुमार वृक्षतोडीमुळे झाल्याचे अनुमान भूगर्भ शास्त्रज्ञानी व्यक्त करत तातडीने याठिकाणी उपाययोजना करण्याच्या सूचना महसूल यंत्रणेला दिल्या आहेत. दरम्यान डोंगराला पडलेल्या भेगा आणि तिलारी खोऱ्यात कोसळणारा धो-धो पाऊस यामुळे मांगेलीत ‘माळीण’चा थरार तर तेथील लोकांना अनुभवावा लागणार नाही ना? अशी दाट भीती नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.

थेट कर्नाटकच्या बॉर्डरवर डोंगराच्या माथ्यावरून कोसळणाऱ्या धबधब्यामुळे मांगेली गाव सर्वदूर परिचित झालं होतं. यामुळे त्याठिकाणी पर्यटनला मोठा वाव होता. मात्र आता याच गावात भूस्खलनाच्या धोका निर्माण झाला आहे. मांगेली फणसवाडी येथे काही ठिकाणी डोंगराला भेगा गेल्यामुळे या ठिकाणी भूस्खलन होऊन त्याखाली असलेली कुसगेवाडी तसेच फणसवाडीतील काही घरे व देऊळवाडी येथील नागरिकांना या भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. भविष्यात असेच भूस्खलन झाल्यास मांगेलीचे माळीण व्हायला वेळ लागणार नाही, अशी दाट भीती भूगर्भाशास्त्रज्ञ यांच्याकडे लोकप्रनिधींतून व्यक्त होत आहे.

त्याचसाठी आज बुधवारी पंचायत समिती सदस्य बाबुराव धुरी तसेच महसूल प्रशासन आणि ओरस येथून आलेल्या भूवैज्ञानिक यांच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. अतिवृष्टी आणि वृक्षतोड यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून त्याठिकाणी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना भूवैज्ञानिक यांनी संबंधित महसूल विभागाला दिले आहेत. काही करून या भेगा पडलेल्या डोंगरात येणारे पाणी वळविणे आवश्यक आहे अन्यथा परिस्थिती गंभीर होऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार योग्य ती कारवाई करणार असल्याचे महसूल विभागाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान आताच मांगेली फणसवाडीत काही घरांची परिस्थिती ही अत्यंत वाईट असून अनेक घरांना भेगा गेलेल्या आहेत. तर देऊळवाडी येथील एका घरात भूस्खलन झाल्यामुळे चक्क पाणी घुसले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही हे जमेची बाजू म्हणावी लागेल. मात्र याठिकाणी प्रशासनाने सतर्क होऊन वेळीच उपाययोजना आखण्याची गरज आहे. भूगर्भ वैज्ञानिक सागर देसाई, संतोष पाटील, नायब तहसीलदार एन. एन. देसाई, पंचायत समिती सदस्य बाबुराव धुरी, यांसह मंडळ अधिकारी प्रेमानंद सावंत, शिवसेना जिल्हा उपसंघटक गोपाळ गवस, युवा सेनेचे भगवान गवस, मांगेली सरपंच विश्वनाथ गवस व ग्रामस्थ उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!