खतं आणि बियाणी वाटपावरून मांद्रेचे राजकारण तापलं

एकमेकांवर टीकेची तोफ; सोपटे विरुद्ध आरोलकर, तर आर्लेकर विरुद्ध आजगावकर

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः पेडणे तालुक्यातील दोन्ही मतदारसंघांत सध्या मगो पक्षाने भाजप आमदारांच्या नाकात दम आणलाय. पेडणेत मगोचे नेते प्रविण आर्लेकर तर मांद्रेतून जीत आरोलकर यांनी धडाकाच लावल्याने उपमुख्यमंत्री बाबू आजगांवकर आणि आमदार दयानंद सोपटे यांच्यासमोर जबरदस्त पेच निर्माण झालाय. सध्या वेगवेगळ्या विषयांवरून दोन्ही बाजूंनी एकमेकांवर टीकेची तोफ सुरू असल्याने तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर पेडणे तालुक्यात राजकीय वादळ घोंगावत असल्याचं दिसून येतं.

हेही वाचाः मुख्यमंत्री सावंतांना भरपाई देण्यात नाही, कमिशन घेण्यात रस

निमित्त खतं आणि बियाणं वाटपाचं

मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे हे दरवर्षी मान्सूनच्या आगमनापूर्वी मतदारसंघातील शेतकऱ्यांना खतं आणि बियाणांचं वाटप करतात. यंदाही त्यांनी या कार्यक्रमाला सुरूवात केलीए. आता आमदार एखादी गोष्ट वाटतात आणि ते देखील सत्ताधारी म्हटल्यावर लोकांना हा सरकारी कार्यक्रमच आहे, असं वाटणं स्वाभाविक आहे. पेडणे तालुक्यातील केरी या गावांत सोपटे यांचा कार्यक्रम होता. तेथील कार्यकर्त्यांनी गावांतील शेतकऱ्यांची यादी तयार केली होती. काही शेतकऱ्यांना कार्यक्रमाची पूर्व माहिती दिली गेली आणि ते शेतकरी कार्यक्रमाला हजर राहीले. विशेष म्हणजे या यादीत काही शेतकऱ्यांची नावं वगळण्यात आली, असा आरोप मगोचे नेते जीत आरोलकर यांनी केलाय. जीत आरोलकर यांच्या कार्यक्रमांना आणि त्यांच्या गटात असलेल्यांना वगळण्यात आल्याची टीकाही त्यांनी केलीये. याचवेळी एक युवती रांगेत उभी राहीली होती. तिला जाणीवपूर्वक बराच वेळ उभी ठेवण्यात आली आणि तिची वेळ आली तेव्हा तिचा सर्वांसमक्ष अपमान करण्यात आला,असा पोस्ट जीत आरोलकर यांनी आपल्या फेसबुकवर टाकला.

सोपटेंचे प्रत्यूत्तर

मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी जीत आरोलकर यांच्या या पोस्टवर आपला एक पोस्ट टाकून त्यांच्या या आरोपांना चोख प्रत्यूत्तर दिलं. जीत आरोलकरांच्या पोस्टला खोटा प्रचार असं त्यांनी म्हटलंय. जीत आरोलकर यांनी शेतीला कधीच प्रोत्साहन दिलं नाही. आपण हे कार्य कितीतरी काळापासून करतोय आणि आल्या विरोधकांनीही या कार्याची स्तुती केलीये, असंही सोपटे यांनी म्हटलंय. जीत आरोलकर यांनी केलेला आरोप तथ्यहीन आहे आणि तसा प्रकार अजिबात घडला नाही, असा दावा त्यांनी केलाय. आपण मांद्रे मतदारसंघातच जन्मलो आणि वाढलो. गेली 22 वर्षं आपण राजकारणात आहे आणि सगळेजण आपल्याला ओळखतात, असा टोलाही त्यांनी लगावलाय. आपल्या कार्यक्रमावर शेतकऱ्यांनी बहिष्कार टाकला, असं म्हणून जीत आरोलकर यांनी आपली पात्रता सिद्ध केली, असा आरोप सोपटे यांनी केलाय.

जीत आरोलकरांचा पलटवार

मगोचे नेते जीत आरोलकर यांनी सोपटेंनी दिलेल्या स्पष्टीकरणाला तेवढ्यात ताकदीने पलटवार केलाय. केरी येथे त्यांनी मगोतर्फे खतं आणि बियाणी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला. यावेळी सुमारे 50 ते 70 शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला. सोपटे यांनी खरोखरच पक्षविरहीत सर्वांनाच खतं आणि बियाणी दिली होती तर मग हे शेतकरी कसे काय वंचित राहीले, असा घणाघाती आरोप त्यांनी केला. एवढंच नव्हे तर रांगेत अपमान झाल्याचा आरोप असलेल्या युवतीनेही झालेल्या प्रकाराची माहिती दिली आणि जीत आरोलकर यांनी फेसबुकवर टाकलेल्या पोस्टात तथ्य होते, असंही म्हटलंय. कोरोनाचे संकट आणि त्यात तौक्ते वादळामुळे झालेली हानी अशावेळी आमदारांनी लोकांना वाऱ्यावर सोडलेय. ते केवळ घरी बसून अहवाल मागवताहेत. लोक मात्र कुणीतरी मदतीचा हात पुढे करेल, या अपेक्षेने आहेत. केवळ आपल्याच काही मोजक्याच लोकांच्या नुकसानीचा आढावा घेऊन आमदार निसटले पण बाकीच्या लोकांचं काय, असंही आरोलकर म्हणाले. या कठीण प्रसंगी आमदार प्रत्यक्ष ग्राउंडवर हजर राहणं गरजेचं होतं. त्यांच्या एकूणच कार्यपद्धतीवरून त्यांनी मांद्रेच्या जनतेची आपले आणि विरोधक अशी विभागणी केल्याचंच दिसून येतं. आमदारांना सगळी जनता समान असण्याची गरज आहे,असेही आरोलकर यांनी म्हटलंय.

हेही वाचाः सावंत सरकारने आपल्या अपयशाची जबाबदारी स्वीकारावी

बाबूचा आर्लेकरांवर कार्यकर्तास्त्र हल्ला

मगोचे नेते प्रविण आर्लेकर यांनी पेडणेत बाबू आजगांवकर यांच्या नाकात दम आणलाय. सध्या आर्लेकरांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढलाय. अडचणीत सापडलेल्या लोकांना मदतीचा हात पुढे करून तसंच पेडणे मतदारसंघाला भेडसावणारे विषय ते हातात घेऊ लागल्याने बाबू आजगांवकर बरेच नाराज आहेत. बाबू आजगांवकर यांनी आपल्या काही प्रमुख कार्यकर्त्यांना पुढे करून आर्लेकरांवर टीकेची झोड उठवली आहे. संतोष मळीक, सुर्यकांत तोरस्कर आणि आता भाजप मंडळ पेडणेचे अध्यक्ष तुळशीदास गांवस यांनी आर्लेकरांना टार्गेट केलंय. पेडणेसाठी आर्लेकरांचं योगदान काय,असा सवाल करण्यात आलाय. या आरोपांना आर्लेकरांनीही प्रत्यूत्तर दिलंय. बाबू आजगांवकर यांनी रस्ते, गटारे बांधली पण शिक्षण, पायाभूत सुविधा, आरोग्य सुविधा, तंत्रशिक्षण याबाबत पेडणेत काय केले, असा प्रश्न केला. पेडणे किंवा पूर्वीच्या धारगळ मतदारसंघातून निवडणूक लढवताना त्यांचे योगदान काय होते, असा सवालही आर्लेकर यांनी केलाय. एकंदरीत संपूर्ण पेडणे तालुक्यात सध्या कोरोना, तौक्ते याच्याबरोबरच राजकारणही बरंच रंगल्याचं दिसून येतं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!