मांद्रे गट काँग्रेसतर्फे धरणे आंदोलन

इंधन दरवाढीचा केला निषेध; हारसन पेट्रोल पंप आवारात धरलं धरणे

मकबूल | प्रतिनिधी

पेडणेः मांद्रे गट काँग्रेसने हरमल येथील हार्सन पेट्रोल पंपच्या आवारात धरणे आंदोलन करत इंधन दरवाढीचा निषेध केला. दरम्यान पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे वाहतूक व्यवस्थेबरोबरच अत्यावश्यक वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्याने त्याची झळ सर्वसामान्य जनतेला पोहोचली आहे. भाजप सरकारने निदान कोविड काळात तरी इंधनावरील वाढीव दर खाली आणून ढासळलेल्या अर्थव्यवस्थेत आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या लोकांना दिलासा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे युवा नेते सचिन परब यांनी केलीये.

काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित

शुक्रवार ११ जून रोजी संध्याकाळी पार पडलेल्या या धरणे आंदोलनात सचिन परब, उत्तर जिल्हा सचिव प्रमेश मयेकर, मांद्रे गट काँग्रेस अध्यक्ष आनंद शिरगांवकर, मांद्रे युवक काँग्रेसचे सरचिटणीस सुरज तळकर, लक्ष्मीकांत शेटगांवकर, गुरु पांडे, अरुण वस्त, महेश कांबळी, व्हिल्सन फर्नांडिस, भिकाजी तळकर, प्रदीप सावंत, विनोद सावंत, नामदेव तुळसकर, काशिनाथ शिरोडकर, राजू गावडे, संजय तारी तसंच इतर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

सामान्यांचं जगणं केलं कठीण

यावेळी भाजप सरकारच्या विरोधात विविध घोषणा देऊन तसंच हातात सरकारच्या विरोधातील फलक घेऊन मांद्रे काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध केला. यावेळी सचिन परब म्हणाले, काँग्रेस सरकारच्या काळात मनमोहन सिंग पंतप्रधान असताना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोलच्या बॅरलची किंमत १०७ रुपये याप्रमाणे होती. त्यावेळी ५० -६५ पर्यंत पेट्रोल लिटर दर आकारला जात होता आणि आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठ बॅरल किंमत ६५ डॉलर असताना पेट्रोल डिझेलच्या दरांनी अनेक राज्यात शतक पूर्ण केलं आहे. गोव्यात पेट्रोल-डिझेलचे दर 100 च्या जवळ पोहोचलेत. कोविड काळात उत्पन्नाचा स्रोत एकदम खाली येऊन अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली असताना अशा कठीण प्रसंगी आज मोदी सरकारच्या महागाईच्या डोलाऱ्यापुढे लोकांच्या डोळ्यातून अश्रू गळू लागलेत. मात्र अदानी -अंबानीच्या उत्पन्नाचा स्रोत वाढण्याची काळजी भाजप सरकारने घेतली आहे. सर्वसामान्यांचं जगणंच भाजप सरकाने कठीण करून ठेवलंय.

अनिल अंबानीचं चोचले पुरवणारं सरकार

मोदी सरकार हे सर्वसामान्य गरीब जनतेचं सरकार नसून अनिल अंबानींचे चोचले पुरवणारं सरकार असल्याचा आरोप प्रमेश मयेकर यांनी केला. मांद्रे मतदार संघात आज अनेक बाबतीत सर्व सामान्य लोकांना न्याय मिळत नाही. हल्लीच आपण आपल्या आरोग्य अहवालासाठी मांद्रेतील एका आरोग्य केंद्रावर गेलो असता एका ज्येष्ठ नागरिकाचा प्राणवायू कमी झाल्याने लागेच डॉ. शेट्येंनी रुग्णावाहिका बोलावली. मात्र तीन चार तास रुग्णवाहिका उपलब्ध होणार नसल्याची सबब फोनवरून पुढे करण्यात आली. एका डॉक्टरला जिथे अशी वागणूक मिळत असेल तिथे सामान्य व्यक्तीची काय गत होईल, असा सवाल मयेकरांनी केला.

हेही वाचाः तौक्ते चक्रीवादळाने केलेली नुकसान भरपाई सरकारने त्वरित द्यावी

मांद्रेवासीयांवर अन्याय

सरकारने नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाई, वादळी पावसाने शेतीची झालेली नासाडी यासंदर्भांत मांद्रेत अनेकांवर अन्याय केलाय. या समस्यांचा पाठपुरावाही होताना दिसत नाही, असं ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते लक्ष्मीकांत शेटगांवकर म्हणालेत.

हेही वाचाः बुडालेल्या कुर्डी गावात कबर आली कुठून?

सरकार लोकांना पिळतंय

डिजिटल इंडियाच्या नावे लोकांचा पैसा बँक खात्यावर जमा झाल्यानंतर त्यावर कर रूपाने १२ रुपये तसंच जीएसटी आणि विमा कापून घेतला जातो. अशा पद्धतीने लोकांना पिळलं जातंय. काही दिवसांनी आज १० – १२ रुपये असलेली पाण्याची बाटलीही उद्या महागलेली दिसेल. भाजप सरकारने सामान्य जनतेचं कंबरडच मोडून टाकलं आहे, असं गुरु पांडे म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!