मांद्रे मतदारसंघातून सचिन परब यांच्या दावेदारीला मांद्रे गट काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा

मांद्रे गट काँग्रेसचा पत्रकार परिषदेत दावा; मांद्रे एंटरटेन्मेंट सिटी प्रकल्प लोकांवर लादू नका; स्थानिकांना विश्वासात घेऊन माहिती द्या

मकबूल | प्रतिनिधी

पेडणे: मांद्रे मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर मीडियाच्या माध्यमातून काँग्रेसचे युवा नेते सचिन परब यांनी केलेल्या दाव्याला मांद्रे गट काँग्रेसचा पूर्णपणे खंबीर पाठिंबा राहील. जो पक्षासाठी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे कार्य करतो त्या युवा नेतृत्वाचाच पक्षाने यावेळी मांद्रेतून उमेदवारीसाठी विचार करावा अशी मागणी नुकत्याच गोवा दौऱ्यावर आलेल्या काँग्रेस निरीक्षकांकडे आम्ही केली आहे. यावेळची उमेदवारी युवा नेतृत्वालाच दिली जाईल, असा विश्वास मांद्रे गट काँग्रेस आणि पक्ष कार्यकर्त्यांना आहे, असं मांद्रे गट काँग्रेसतर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे मांद्रे गट अध्यक्ष आनंद शिरगांवकर म्हणाले. या पत्रकार परिषदेला गट अध्यक्ष शिरगांवकर, उत्तर जिल्हा सचिव प्रमेश मयेकर, व्हिल्सन फर्नांडिस,लक्ष्मीकांत शेटगांवकर, नामदेव तुळस्कर, मांद्रे युवक काँग्रेसचे सरचिटणीस सुरज रेडकर आदी उपस्थित होते.

हेही वाचाः बिगर गोमंतकीयांसाठी सरकारकडून खास लसीकरण मोहीम

पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला राज्यातील कोविड मृतांना श्रद्धांजली समर्पित करण्यात आली. तसेच कोविड बळींच्या कुटुंबाला न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र सरकारने जाहीर केलेले ४ लाखांचे आर्थिक साहाय्य त्वरित देण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी पक्ष पुढे जाण्यासाठी प्रयत्न करणार

यापूर्वी मांद्रे मतदारसंघांतून काँग्रेस पक्षाचं नेतृत्व ऍड. रमाकांत खलप, संगीता परब यांनी केलं आहे. त्यानंतर २०१९ च्या पोटनिवडणुकीत बाबी बागकर यांना पक्षाची उमेदवारी दिली गेली. परंतु त्यावेळी पक्षाकडून थोडी फार गफलत झाली असेल किंवा स्वतः बागकर कुठे तरी कमी पडल्याने काँग्रेस पक्षाला पराभवाला सामोरं जावं लागलं. मात्र यावेळी तशी परिस्थिती उद्भवणार नाही. मात्र पक्षाने युवा उमेदवाराची निवड करणं विजय मिळवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. ऍड.रमाकांत खलप, संगीता परब यांच्या मार्गदर्शनानुसार आणि त्यांचे चांगले आणि सजग विचार घेऊन पक्ष यावेळी पुढे जाण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आनंद शिरगांवकर म्हणाले.

हेही वाचाः एंटरटेनमेंट सिटीसाठी जागा मिळते, मग कलाकारांच्या कला भवनसाठी जागा का नाही?

पक्षाच्या वरिष्ठांनी सचिन परबांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करावं

२०१७ च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर दयानंद सोपटे मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले. दोन वर्षांच्या आतच त्यांना दुर्बुद्धी सुचली आणि ते भाजपात गेले. २०१९ च्या पोटनिवडणुकीत ते पुन्हा विजयी झाले. त्यावेळपासून काँग्रेस पक्षाच्या कार्याला मरगळ प्राप्त झाली. अशा कठीण प्रसंगी सचिन परब यांनी मांद्रेतून पक्षाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी लोकसंपर्क वाढवला. पक्षाच्या विखुरलेल्या कार्यकर्त्यांची जुळवाजुळव केली. त्यामुळे आज काँग्रेस पक्षाला कुठे तरी संजीवनी प्राप्त झाली. आज त्यांच्याशिवाय मांद्रेतील एकही नेता पक्षहीत जाणून काम करताना दिसत नाही. मात्र निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने आता अनेकजण डोकं वर काढू लागलेत. पडत्या काळात पक्ष सावरण्यासाठी परबांशिवाय दुसरा कोणीच मतदारसंघांत फिरकला नाही. पक्षाच्या वरिष्ठांनी योग्य अंतरिम अहवालानुसार पक्षहीत जाणून यावेळी सचिन परबांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करावं अशी मागणी शिरगांवकरांनी केली.

हेही वाचाः प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वाचनाचं खूप महत्व

सुशोभीकरण केलं म्हणजेच विकास झाला का?

आमदार दयानंद सोपटेंनी काँग्रेस सोडल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करताना आपल्याला मंत्रिपद मिळणार असल्यानं आपण मांद्रे मतदारसंघाचा विकास आणि येथील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं मांद्रेवासीयांना ठासून सांगितलं होतं. शेवटी मंत्रिपद नाहीच आणि विकास कामं करण्यातही ते पूर्णपणे अपयशी ठरले. मांद्रेतील कितीजणांना त्यांनी रोजगार दिला? किती प्रकल्प आणले? आणि कोणती विकासकामे त्यांनी स्वतः केलीत?हे त्यांनी जाहीर करावं. रस्त्यांची तर पूर्णपणे दुर्दशा झाली आहे. गॅस, पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडलेत. त्यामुळे ग्रामीण भागाला त्याचा मोठ्या फटका बसला आहे. मांद्रेत पर्यटन संपलेल्यात जमा आहे. हायमाक्स दिवे बसवले आणि सुशोभीकरण केलं म्हणजेच विकास झाला का? असा प्रश्नही शिरगांवकरांनी उपस्थित केला.

हेही वाचाः भाजप सरकार विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळतंय

आणि मगच प्रकल्प साकारावेत

पर्यटन मंत्र्यांनी मनोरंजन प्रकल्पाचं नवीन पिल्लू सोडलं आहे. रोजगारीत प्रकल्प मतदारसंघात यावेत या मताचे आम्ही आहोत. त्यासाठी येऊ घातलेल्या या प्रकल्पाचं मांद्रेत काँग्रेस पक्ष स्वागत करत आहे. परंतु स्थानिकांवर प्रकल्प लादण्यापूर्वी सरकारने तो प्रकल्प स्थानिक पंचायत आणि लोकांना विश्वसात घेऊन तो कसा आहे, त्यातून रोजगार किती प्रमाणात मिळणार आहे, स्थानिकांना त्याचा काय फायदा होईल हे स्पष्ट करावं आणि मगच प्रकल्प साकारावेत, असा सल्ला शिरगांवकरांनी यावेळी उपमुख्यमंत्री तसंच स्थानिक आमदारांना दिला.

आगामी निवडणुकीत मांद्रेतून काँग्रेसचे आमदार विजयी होतील

हल्लीच सरकारने बेकायदेशीर घरं कायदेशीर करण्याचं सूतोवाच केलं होतं. मात्र कागदोपत्री त्याची अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्यासाठी सरकारने किचकट प्रक्रिया न करता सुटसुटीत पद्धतीने कायदेशीर स्वरूप देण्याचा शक्यतो लवकर प्रयत्न करावा. जेणेकरून गरीब लोकांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. मांद्रेत सध्या काँग्रेस पक्ष सक्रीय आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मांद्रेतून काँग्रेसचे आमदार विजयी होतील, याचा शिरगांवकरांनी पुनरुच्चार केला.

हेही वाचाः नारायण दत्ता नाईक यांच्यावर जीवघेणा हल्ला

काँग्रेसच्या उमेदवारीसाठी सचिन परब हेच सक्षम उमेदवार

आमदार सोपटेंना भाजपात गेल्यानंतर मंत्रिपद मिळणार होतं आणि मांद्रे मतदारसंघाचा विकास करण्यासाठी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. मंत्रिपद नाहीच, मात्र मांद्रेचा विकास साधण्यातही ते पूर्ण अपयशी ठरलेत. कोविड काळात आरोग्य खात्याची यंत्रणा कुचकामी ठरली. तुये हॉस्पिटलला आमदार या नात्याने त्यांनी कोणत्या सुविधा पुरवल्या? काँग्रेसच्या उमेदवारीसाठी सचिन परब हेच सक्षम उमेदवार आहेत. कारण पडत्या काळात त्यांनी पक्ष सावरण्याचे प्रयत्न केलेत. जो काम करतो त्यालाच पक्षाने उमेदवारी द्यावी, अशी मागणी प्रमेश मयेकरांनी केली.

हेही वाचाः ‘ईडी’नं जप्त केली अभिनेता डिनो मोरियाची संपत्ती ; मनी लॉण्ड्रिंगचा आरोप

सरकारने स्थानिक शेतकऱ्यांसाठी एककलमी कार्यक्रम राबवून कृषी विकासाला चालना द्यावी

शेतकरी आज हवालदिल बनला आहे. सरकारच्या योजना केवळ कागदोपत्री दिसतात. मात्र त्याची योग्य पद्धतीने कार्यवाही होताना दिसत नाही. शेतीसाठी लागणारी अवजारे, हार्वेस्टिंग कटर आणि अन्य साहित्य आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. पूर्वी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक कार्यरत होते. त्यामुळे ते शेतात जाऊन शेतीची पीक पाहणी करायचे, कायदेशीर अहवाल तयार करून योजना शेतकऱ्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला जायचा. आज ही सोय नसल्यानं शेतकरी सरकारच्या अनेक सुविधांपासून वंचित राहतायत. सरकारने स्थानिक शेतकऱ्यांसाठी एककलमी कार्यक्रम राबवून कृषी विकासाला चालना द्यावी, अशी मागणी लक्ष्मीकांत शेटगांवकरांनी केली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!