मांद्रे मतदारसंघात राजकीय समीकरणांना वेग

ज्या दिवशी खलप आणि सचिन परब एकत्रित येतील आणि दोघांपैकी कुणालाही जरी उमेदवारी मिळाली, तरीही एकमेकांसाठी मनापासून काम करतील, तेव्हाच विजय शक्य आहे. सध्या तरी आमदार दयानंद सोपटे यांची बाजू भक्कम आहे.

सिद्धार्थ कांबळे | प्रतिनिधी

पेडणे : सध्या करोना महामारीचे संकट आहे. जो तो आपल्या सुरक्षिततेच्या नजरेतून काम करत आहे. मात्र, दोन वेळा या मतदारसंघातून मोठ्या फरकाने निवडून आलेले आमदार दयानंद सोपटे (Dayanand Sopte) यांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्ते एकवटल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे मांद्रे मतदारसंघातील राजकीय समीकरणांना वेग आला आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते सचिन गोपाळ परब (Sachin Parab) हे मात्र पूर्ण मतदारसंघात नागरिकांना मदतीचा हात देण्याच्या उपक्रमातून लोकापर्यंत पोचलेले आहे . 2019च्या पोटनिवडणुकीत बाबी बागकर (Babi Bagkar) यांचा आमदार दयानंद सोपटे यांनी पोटनिवडणुकीत दारुण पराभव केल्यानंतर पक्षाचे अस्तित्व संकटात सापडले होते. अशा कठीण प्रसंगी सचिन परब यांनी पक्षाला उभारी देण्यासाठी विविध उपक्रम राबवले. पक्षाचा निधी न वापरता स्वत:च्या खिशातले पैसे खर्च करून गरजवंतांना मदत केली. करोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे कार्य मांद्रेत शून्य होत असताना काँग्रेसच्या झेंड्याखाली सचिन परब यांनी कार्य करून पक्ष जिवंत ठेवला. आता तेच पुढील निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास सज्ज झाले आहेत .

दरम्यान, या मतदारसंघातून सात वेळा मगो पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले रमाकांत खलप (Ramakant Khalap) यांनीही आपल्या जाणत्या आणि युवा मतदारांकडे संपर्क साधून लोकमत अजमावण्याचा प्रयत्न केला आहे. या मतदारसंघात खलप यांना मानणारे अनेक मतदार आजही त्यांच्यामागे खंबीरपणे उभे आहेत. त्यांनीही लोकांकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. ते अभ्यासू वृत्तीचे असल्याने केंद्रातही त्यांचे वजन आहे. ते वजन वापरून त्यांनी पोटनिवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी मिळवली होती. मात्र, ऐनवेळी स्थानिक नेत्यांमध्ये दोन तीन गट पडल्यामुळे त्याचा पत्ता कट करून बाबी बागकर यांना उमेदवारी देऊन त्यांना बळीचा बकरा बनवण्यात आले.
भाजपचे आमदार दयानंद सोपटे ज्या दिवशी लॉक डाऊन केले त्या दिवसापासून लोकांच्या संपर्कात आहेत. कुणाला काय हवे काय नको याची त्यांनी सलग सहा महिने चौकशी केली. त्यामुळे ते लोकप्रिय आहेत. त्यांच्या विरोधात या दोन्ही नेत्यांना दोन हात करण्यासाठी त्या वेळी शक्य होईल ज्या दिवशी खलप आणि सचिन परब एकत्रित येऊन दोघांपैकी कुणालाही जरी उमेदवारी मिळाली तरीही एकमेकांसाठी मनापासून काम करतील तेव्हाच शक्य आहे. सध्या तरी आमदार दयानंद सोपटे यांची बाजू भक्कम आहे.

रमाकांत खलप यांनी येणार्‍या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार असणार आहेत. खलप आणि परब या दोघांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी चुरस असून त्यांनी कार्यकर्त्यांच्या, लोकांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे.

गत पोटनिवडणुकीत पहिल्यांदाच अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात जीत आरोलकर उभे होते आणि तब्बल 9 हजार 490 मते घेऊन त्यांनी आपणही पुढील निवडणुकीत प्रमुख दावेदार आहोत हे सिद्ध केले.आगामी निवडणुकीत ते मगो पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

मंत्री झाल्यानंतर होतो मांद्रे मतदारसंघात पराभव
आता पर्यंत मांद्रे मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर जो आमदार म्हणून मतदार संघातून निवडून आला तो मंत्री झाला ,आणि मंत्री झाल्यानंतर त्यांचा पराभव झाला. राजकारणात कुणी कुणाचा शेवटपर्यंत मित्र आणि शत्रूही नसतात , राजकारणात काहीही घडू शकते. आमदार दयानंद सोपटे यांनी तर दोन्ही वेळा कठीण प्रसंगी आमदारकी खेचून आणली. त्यांना टक्कर देण्यासाठी सक्षम उमेदवार मिळाला तरच अशक्य ते शक्य होऊ शकते.

उमेश गावकरही रिंगणात?
माजी पोलीस अधीक्षक उमेश गावकर यांना काँग्रेस पक्षात आणण्यासाठी काँग्रेसचा एक गट कार्यरत झाला आहे. मागच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसतर्फे त्यांना गळ घालण्यात आली होती, परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. आता मात्र एक गट त्यांना काँग्रेस पक्षात आणण्यासाठी कार्यरत झाला आहे. दरम्यान, उमेश गावकर यांच्याकडे संपर्क साधला असता योग्य वेळी निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!