ब्रेकिंग | मृतांच्या आकडेवारीचे सगळे रेकॉर्ड मोडीत! मंगळवारी तब्बल 26 बळी

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो : राज्यातील मृत्यूदराचं संकट अधिकाधिक गडद होताना पाहायला मिळत आहे. चिंताजनक बाब म्हणजे आतापर्यंत 24 तासांस नोंदवण्यात आलेल्या मृतांच्या आकडेवारीचे सगळे रेकॉर्ड मोडीत निघाले आहे. मंगळवारी राज्यात तब्बल 26 जणांचा बळी गेल्यानं हाहाकार उडालाय. 24 तासांत इतके मृत्यू कोरोनामुळे होण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या काही दिवसांत सातत्यानं रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण वाढतंय. रुग्णवाढीसोबतच आता वाढत्या बळींची आरोग्य यंत्रणेची पोलखोलही करायला सुरुवात केल्याचं अधोरेखित होताना पाहायला मिळत आहे. गेल्या 3 दिवसांत राज्यात 54 रुग्णांचा मृत्यू झालाय. सोमवारी 17, रविवारी 11 तर सलग तिसऱ्या दिवशी मंगळवारी 26 रुग्ण दगावल्यानं खळबळ उडाली आहे.

कुठे किती मृत्यू?
राज्यात जीएमसीत 16 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. तर दक्षिण जिल्हा रुग्णालयात 8 जणांचा मृत्यू झालाय. दरम्यान बेतकी आणि उत्तर गोव्यातील खासगी रुग्णालयात प्रत्येक एकाचा बळी गेलाय. त्यामुळे उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही जिल्ह्यांमध्ये रुग्णांच्या उपचारावरच आता सवाल उपस्थित केले जाऊ लागले आहेत.
हेही वाचा – Six Minute Walk Test : तुमची फुफ्फुसं व्यवस्थित आहेत का?

नव्या रुग्णवाढीचाही रेकॉर्ड
भयंकर वेगानं राज्यात नव्या कोरोना म्युटंटचा संसर्ग होत आहे. 24 तासांत नव्या 1 हजार 160 रुग्णांची राज्यात भर पडली आहे. तर 142 रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाले असून आता सक्रिय रुग्णसंख्या 8 हजार 241वर पोहोचली आहे. 26 बळींसोबत राज्यातील एकूण मृतांचा आकडा 926वर पोहोचला आहे. पर्वरी, कांदोळी आणि मडगावमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. त्यापाठोपाठ फोंडा, पणजी आणि म्हापशातही चिंताजनक स्थिती आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आलाय. ज्याचा फटका रुग्णांना उपचार देताना बसण्याचीही भीती व्यक्त केली जाते आहे. राज्याचा रिकव्हरी रेट हा खूप खाली घसरला असून आता तो 86.77 टक्क्यांवर आल्यानं चिंता व्यक्त केली जाते आहे.
हेही वाचा – अनेक राज्यांनी लागू केलेल्या लॉकडाऊनचा विमान कंपन्यांना फटका