कोविडमुळे गोवा पर्यटनाचे 2 हजार 62 कोटींचे नुकसान, लाखो लोकांच्या नोकऱ्या जाण्याचीही भीती

1.22 लाख नोकऱ्या गमावण्याची शक्यता

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्यात खाणबंदी होऊन त्याचा मोठा फटका महसूलावर पडलाय. आता कोविडने राज्याची आर्थिक स्थिती आणखीनच भयानक केलीय. कोविडमुळे लागू झालेल्या लॉकडावनचा मोठा फटका राज्याच्या पर्यटनाला बसलाय. या काळात पर्यटन क्षेत्राचे 2062 कोटींचे नुकसान झाल्याची धक्कादायक माहिती पर्यटनमंत्री मनोहर उर्फ बाबू आजगांवकार यांनी दिलीय. विधानसभा अधिवेशनात एका प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरातून ही आकडेवारी बाहेर आलीय.

धक्कादायक, चिंताजनक

कोविडकाळाचा एकूणच राज्याच्या पर्यटन क्षेत्रावर नेमका काय परिणाम झालाय, याचं उत्तर शोधण्यासाठी एक सर्वेक्षण करण्यात आलं. या सर्वेक्षणाचा अहवाल धक्कादायकच नव्हे तर राज्याची चिंता वाढवणारा ठरलाय. कोविडमुळे आत्तापर्यंत 2062 कोटींचे नुकसान झालंय. 2020-21 ह्या वर्षांत एकूणच पर्यटन हंगामांचं संभाव्य नुकसान 7239 कोटींवर पोहचण्याची शक्यता या अहवालात व्यक्त करण्यात आलंय. या परिस्थितीमुळे 1 लाख 22 हजार लोकांच्या रोजगारावर गंडांतर येणार असल्याचेही या अहवालात स्पष्ट करण्यात आलंय, असं या लेखी उत्तरात म्हटलंय.

फातोर्ड्याचे आमदार तथा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी हा प्रश्न विचारला होता. गोव्याचे पर्यटन धोरण तयार केलेल्या केपीएमजी या कंपनीलाच या सर्वेक्षणाचे काम देण्यात आले होते. या सर्वेक्षणातूनच ही भयानक माहिती समोर आलीय.

प्रयत्नांना यश कधी?

दरम्यान, पर्यटन क्षेत्रातील व्यवसायिकांना दिलासा मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या व्यवसायाला फेरचालना मिळवून देण्यासाठी या उद्योग क्षेत्राशी संबंधीत परवान्यांना मुदतवाढ देण्यात आलीय. सरकारने शॅक्स शुल्क नुतनीकरणात 50 टक्के करून त्यांना दिलासा देण्याचाही प्रयत्न सरकारने केलाय.

हेही वाचा – विजय सरदेसाई आणि बाबू आजगांवकरांमध्ये तुफान खडाजंगी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!