महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी देणार राजीनामा!

पंतप्रधान मोदींजवळ जबाबदारीतून मुक्त करण्याची इच्छा व्यक्त

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे राजीनामा देणार आहेत. खुद्द राज्यपालांनीच राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनाचा उर्वरित काळ चिंतन, मननात घालविण्याचा मानस पंतप्रधान नरेंद्र मोदींना कळवला, अशी माहिती समोर आली आहे.

राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती करतात, पण राज्यपाल हे राष्ट्रपतींना उत्तरदायी असतात. त्यामुळे त्यांनी राष्ट्रपतींकडे मागणी करायला हवी होती, अशा प्रतिक्रिया आता शिवसेना नेत्यांकडून व्यक्त होत आहे.

राजभवनातील प्रसिद्धपत्रकातून माहिती

मुंबईत पंतप्रधान मोदी विकासकामांच्या उद्घाटनासाठी आले. त्यावेळी झालेल्या भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करू इच्छितो अशी इच्छा राज्यपालांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे व्यक्त केली. याबाबतची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीया राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून दिली.

हेही वाचाः सांगेत धोकादायक झाड हटवले

महाराष्ट्राचा राज्यपाल होणे भाग्य

राजभवनातून जारी झालेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्यासाठी अहोभाग्य होते.

गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ‘पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशीर्वाद मिळत राहील,’ असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले असल्याचे राजभवनाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!