दुबळ्या फुफ्फुसांना हवी बळकटी

कोविडमुक्त रुग्णांना जाणवताहेत दीर्घकाळ आरोग्याच्या समस्या. उपचार करण्यासाठी कोणतीही उपाययोजना नसल्याने कोविडमुक्त रुग्णांच्या चिंतेत भर.

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कोविड-19 आजारातून बर्‍या झालेल्या रुग्णांना पुढे अनेक काळ आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत असून विशेषत: फुफ्फुसांवर गंभीर परिणाम झाल्याचा अनुभव येत आहे. मात्र, अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी अद्याप कोणतीही उपाययोजना आखण्यात आलेली नसल्याने कोविडमुक्त रुग्णांच्या चिंतेत भर पडली आहे. सरकारने याविषयी तातडीने विचार करून दुबळ्या फुफ्फुसांच्या पुनर्वसनासाठी विशेष विभाग अर्थात ‘पल्मनरी रिहॅबिलिटेशन’ केंद्रे सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

साधारणतः कोविडचा संसर्ग झाल्यापासून पुढील 14 दिवस रुग्णाला धोका असतो. त्यानंतर रुग्ण धोक्यातून बाहेर येतो. म्हणजे 17 दिवसांनंतर रुग्ण कोविडमुक्त झाल्याचे मानून त्याला नियमित कामकाज करता येऊ शकते, असे आतापर्यंत डॉक्टरांचे म्हणणे होते. मात्र, याबाबत निश्चित आणि ठोस काहीही सांगितले जात नाही. कारण जगभरात सुरू असलेल्या संशोधनातून दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. या माहितीतून एक बाब स्पष्ट होते, ती म्हणजे रुग्ण बरा झाला तरी पुढे कित्येक काळ त्याचे फुफ्फूस कमकुवत होत असून काही लोकांना सतत थकवा जाणवत राहतो.

काहींना श्वसनसंस्थेतील व्याधींना तोंड द्यावे लागत आहे. अशा रुग्णांवर वेळीच उपचार करून फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढवण्यावर भर देणे आवश्यक आहे. वेळीच उपचार न झाल्यास भविष्यात उपचार करणे गुंतागुंतीचे होण्याची शक्यता काही तज्ज्ञांनी यापूूर्वीच व्यक्त केली आहे.
वरील बाब लक्षात घेऊन सरकारने तज्ज्ञांकरवी अभ्यास करून त्वरित उपाययोजना आखावी.

या संदर्भात काही खासगी रुग्णालयांनी ‘पल्मनरी रिहॅबिलिटेशन’ केंद्रे सुरू करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, तेथील खर्च सर्वसामान्य गोमंतकीयांच्या आवाक्याबाहेर आहे. यासाठी सरकारी रुग्णालयांमधून ही केंद्रे सुरू करावीत. तसेच डीएसएसवाय योजनेखाली खासगी रुग्णालयांमधून उपचार घेण्याची सोय करावी, अशी मागणी बरे झालेल्या रुग्णांकडून होऊ लागली आहे.

हृदय, किडनी, यकृताला पोहोचते हानी
संक्रमणातून मुक्त झाल्यावर रुग्णाला कोणते आजार विळखा घालतील, याबद्दल स्पष्टपणे सांगणे आता तरी कठीण आहे. कारण या आजारांची यादी खूप मोठी आहे, याबाबतही अद्याप संशोधन सुरूच आहे. एकंदरीत झालेल्या संशोधनातून करोना संक्रमणावेळी सर्वाधिक नुकसान हे श्वसनतंत्र आणि फुफ्फुसांना पोहोचते. परंतु करोनामुक्त झाल्यावर सर्वाधिक धोका हा फुफ्फुसांबरोबरच हृदय, किडनी किंवा यकृताला होत असल्याचे निरीक्षणात आढळले आहे.

बरे झालेल्या रुग्णांची अवस्था
1. कोविडमुक्त झालेल्या रुग्णांमध्ये पुढील काही महिने फायब्रोसिस, ऑक्सिजनची कमतरता यांसारख्या समस्या येऊ लागल्याचे आढळून येत आहे. यावर उपचार करणे कठीण बनले आहे. बरे झालेल्या रुग्णांत आता इतर आजारांचे सामान्य ते अतिघातक स्तर दिसून येत आहेत. ही स्थिती प्रत्येक रुग्णामध्ये वेगवेगळ्या प्रकारे दिसत आहे.

2. बर्‍या होणार्‍या रुग्णांमध्ये फायब्रोसिस ही समस्या मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. यात फुफ्फुसातील उती डॅमेज होतात. याचा परिणाम म्हणून व्यक्ती योग्य प्रकारे श्वास घेऊ शकत नाही. ही समस्या रुग्णाच्या शारीरिक स्थितीनुसार दिसून येते.

3. काही रुग्णांना तर कोणत्याही पूर्व लक्षणाशिवाय पाच आठवड्यांपर्यंत ताप येत असल्याचे दिसून आले आहे. हा ताप अतिशय गोंधळून टाकणारा आहे. कारण त्याची काही लक्षणेसुद्धा दिसून येत नाहीत. काही लोकांना सतत थकवा जाणवत राहतो. काहीजणांना लूज मोशन आणि उलट्या होण्याची समस्या उद्भवत राहते. काहींचे वजन कमी होत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!