लुईझिन काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते

प्रदेश काँग्रेस समितीच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला ठाम विश्वास

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीची सर्व सूत्रे लुईझिन फालेरो यांच्याकडेच सोपवली आहेत. लुईझिन काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यामुळे, ते कधीच तृणमूल काँग्रेसमध्ये जाणार नाहीत, असा ठाम विश्वास प्रदेश काँग्रेस समितीच्या पदाधिकार्‍यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

त्यामुळे ते कदापि काँग्रेस सोडणार नाहीत

तृणमूल काँग्रेसला गोव्यात पाय रोवायचे आहेत. त्यामुळेच त्यांनी लुईझिन फालेरोंसारखा दिग्गज नेता आपल्या पक्षात येत असल्याची अफवा जाणीवपूर्वक पसरवली आहे. लुईझिन यांचे नाव घेतल्यास काँग्रेसचे निष्ठावंत पदाधिकारी, कार्यकर्तेही तृणमूलकडे येऊ शकतात असा अंदाज बांधूनच त्यांच्या नावाची चर्चा केली जात आहे. पण, त्यात अजिबात तथ्य नाही. लुईझिन यांच्या मनात काँग्रेस सोडायचे असते तर त्यांनी याआधीच पर्‍याय शोधला असता. आता तर पक्षाने विधानसभा निवडणुकीची पूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे दिली आहे. निवडणूक समन्वय समितीच्या अध्यक्षपदी त्यांची नेमणूक करून उमेदवार ठरवण्याचा अधिकारही त्यांना दिलेला आहे. त्यामुळे ते कदापि काँग्रेस सोडणार नाहीत, असा दावा काही पदाधिकार्‍यांनी ‘गोवन वार्ता’शी बोलताना केला.

लुईझिन यांच्यासह इतर अनेक नेते ‘आयपॅक’च्या संपर्कात

लुईझिन फालेरो यांनी प्रशांत किशोर यांच्या ‘आयपॅक’शी चर्चा केली. याचा अर्थ ते तृणमूलमध्ये जातील असा होत नाही. लुईझिन यांच्यासह इतर अनेक नेते ‘आयपॅक’च्या संपर्कात आहेत. म्हणून ते  सर्वजण आपले पक्ष सोडून ऐन निवडणुकीवेळी उगवलेल्या तृणमूलमध्ये जाणे शक्यच नाही, असेही त्यांचे मत आहे.

फालेरोंकडून नकारच

काँग्रेस आमदार लुईझिन फालेरो तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा होत असल्या तरी, फालेरो यांनी मात्र आपण तृणमूलच्या संपर्कात नसल्याची भूमिका कायम ठेवली आहे. शुक्रवारी ‘गोवन वार्ता’शी बोलतानाही त्यांनी आपण आयपॅकच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केली आहे. पण, तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना भेटलो नसल्याचे स्पष्ट केले.

फालेरो गुरूच्या वाटेवरून जाणार नाहीत!

गोव्यात तृणमूल काँग्रेस आणून या पक्षाच्या उमेदवारीवर राज्य विधानसभा निवडणूक लढवलेल्या माजी मुख्यमंत्री डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांचे राजकारणच काही वर्षांनंतर उद्ध्वस्त झालेले होते. तेच डॉ. विल्फ्रेड डिसोझा लुईझिन फालेरो यांचे राजकीय गुरु आहेत. त्यामुळे लुईझिन आपल्या गुरूंच्या मळलेल्या वाटेवरून कधीच जाणार नाहीत, असे मत काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केले. 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!