चक्रीवादळानं सिंधुदुर्गात सुमारे 5 कोटी 77 लाखांचं नुकसान

सर्वात जास्त फटका महावितरणला ; 460 वीज वाहिन्या, 880 विद्युत पोलही तुटले

Goan Varta Live | प्रतिनिधी

सिंधुदुर्गनगरी : चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे 5 कोटी 77 लक्ष 45 हजार 117 रुपयांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. सदर नुकसानीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात एकूण 2 हजार 60 घरांचे अंशतः तर 12 घरांचे पुर्णतः नुकसान झाले आहे. तर 139 गोठ्यांचे, 19 शाळांचे, 11 शासकीय इमारतींचे, 13 शेड्सचे, 4 सभागृहाचे आणि इतर 53 ठिकाणते अंशतः नुकसान झाले आहे. 782 विद्युत पोल अंशतः आणि 98 पोल पुर्णतः पडले आहेत. तर 305 विद्युत वाहिन्यांचे नुकसान अंशतः नुकसान झाले असून 1 विद्युत वाहिनीचे पुर्णतः नुकसान झाल्याची माहिती आहे.
एकूण 2 हजार 72 घरांचे 3 कोटी 42 लक्ष 37 हजार 10 रुपयांचे नुकसान झाले आहे. तर 139 गोठ्यांचे 16 लक्ष 94 हजार 100 रुपये, 19 शाळांचे 8 लक्ष 75 हजार 707 रुपयांचे, 11 शासकीय इमारतींचे 1 लक्ष 70 हजार रुपयांचे, 13 शेडचे 1 लक्ष 10 हजार रुपयांचे 4 सभागृहांचे 6 लक्ष 16 हजार रुपयांचे आणि इतर 6 लक्ष 38 हजार 300 असे नुकसान झाले आहे.

चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका हा महावितरणला बसला. महावितरणच्या एकूण 460 विद्युत वाहिन्या तुटल्या आहेत. त्यामध्ये 330 लो टेन्शन आणि 130 हाय टेन्शन विद्युत वाहिन्यांचा समावेश आहे. त्याशिवाय जिल्ह्यात 880 विद्युत पोलही तुटले आहेत. विद्युत वितरणच्या नुकसानीचा प्राथमिक आकडा हा सुमारे पावणे दोन कोटी रुपयांचा आहे. त्याशिवाय वादळामुळे जिल्ह्यातील 21 सब स्टेशन ही बंद पडली होती. दुपारपर्यंत त्यापैकी 12 ते 13 सब स्टेशन सुरू करण्याचे काम पूर्ण झाले होते. तर उर्वरीत सबस्टेशन सुरू करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी बाहेरील जिल्ह्यातील मनुष्यबळही जिल्ह्यात दाखल होत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!