लोलयेंच्या पंचांकडून मृत गुरांची विल्हेवाट

Goan Varta Live | प्रतिनिधी
काणकोण : मृत गुरांची अनेक वेळा विल्हेवाट लावली जात नाही. रस्त्याकडेला ती तशीच पडून असतात. कालांतराने तिथे दुर्गंधी सुटते. मात्र अशा गुरांची विल्हेवाट लावण्याचे कौतुकास्पद कार्य काणकोणच्या दोघा पंचांनी केले आहे.
शेळी येथील ‘राष्ट्रीय महामार्ग 66’वर अपघात होऊन मृत पावलेल्या दोन गुरांना जेसीबीच्या साहाय्याने खड्डा काढून पुरण्यात आले. याकामी स्थानिक पंचायत सदस्य सचिन नार्इक व सरपंच निशांत प्रभुगावकर यांनी पुढाकार घेतला होता. या महामार्गावर वारंवार अपघात होत असून अपघातात दगावलेल्या गुरांची विल्हेवाट लावणे पंचायतीला आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. काहीवेळा स्थानिकांच्या मदतीनेच या दगावलेल्या गुरांची विल्हेवाट लावावी लागते.
मागच्या पाच महिन्यांपासून बंद असलेली मडगाव-कारवार मार्गावरील मालवाहू आणि अन्य वाहनांची वाहतूक महामार्ग 66 वर वाढली असून भटकी गुरे या रस्त्यावर हकनाक बळी जाण्याच्या प्रकारांतही वाढ झालेली आहे. चाररस्ता ते पोळेपर्यंतच्या रस्त्यावर सर्वत्र भटक्या गुरांचा सुळसुळाट झाला आहे. गुळे ते पोळे या मडगाव-कारवार महामार्गावर आणि नव्या चाररस्ता ते माशेपर्यंतच्या बगलरस्त्यावर एकूण 300 ते 400 गुरे ठाण मांडून असतात. दिवसाकाठी एका जनावराचा अपघातात बळी जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
तालुक्यातील सधन पंचायत म्हणून ओळखल्या जाणार्या लोलये पंचायतीचा ‘ऑक्ट्रॉय कर’ सरकारने बंद केल्यामुळे या पंचायतीच्या उत्पन्नावर परिणाम झालेला आहे. प्रत्येक पंचायतीमध्ये कोंडवाडा असायला हवा, असा न्यायालयाचा आदेश आहे. असे असले तरी कोंडवाड्याचा खर्च कशा पद्धतीने भागवायचा, ही समस्या तालुक्यातील पंचायतींसमोर उभी आहे.