लॉकडाऊनची सरकारला एलर्जी

कोविड निर्बंधांचा नवा आदेश जारी

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

पणजीः देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार कोविड-19 आड सर्वतोपरी योग्य व्यवस्थापन करीत आहे, असा संदेश सर्वंत्र पोहचवण्याचं बंधन प्रत्येक भाजपशासित राज्यांना देण्यात आलंय. कुठल्याही पद्धतीत लॉकडाऊन जारी करण्यात येऊ नये, असेही निर्देश आहेत. तरीही गोव्यात परिस्थिती स्फोटक बनल्यानं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना 3 मेपर्यंत लॉकडाऊन जारी करावा लागला होता. आता परिस्थिती अधीक स्फोटक बनली असताना आणि सरकारातील मंत्री, आमदारांकडूनच लॉकडाऊन वाढविण्याची मागणी होत असताना मुख्यमंत्र्यांनी एक नवी शक्कल लढवली आहे. लॉकडाऊन हा शब्दच वगळून ‘कोविड निर्बंध’ या नव्या शब्दाआड नवे निर्बंध जारी केलेत. पुढील सोमवार 10 मे सकाळी 6 वाजेपर्यंत हे निर्बंध लागू असतील, असं मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी जाहीर केलंय. विशेष म्हणजे लोकांचे जीव वाचवण्यासाठी या निर्बंधाची गरज आहे, असं सांगतानाच लोकांनी या निर्बंधांना लॉकडाऊन समजू नये, असा केविलवाणा प्रयत्न त्यांनी केला खरा. परंतु याबाबत मात्र विरोधक चांगलेच खवळले आहेत.

हेही वाचाः भाजपच्या वैद्यकीय विभागाने सवंग प्रसिद्धी थांबवावी!

खासगी क्षेत्रातील कामगारांच्या जीवाशी सरकार करतंय खेळ

राज्यात 144 कलम सुरूच राहणार आहे. राज्यात लॉकडाऊन नसेल, पण कोविड निर्बंध मात्र जारी असतील असं सांगून अत्यावश्यक सेवांना सकाळी 7 ते संध्याकाळी 7 अशी मुभा दिलीए. सीमेवर मात्र निर्बंध जारी करण्यात आलेले नाहीत. खाजगी क्षेत्रांनी सहकार्य करावं, एवढं सांगून मुख्यमंत्री थांबलेत. खाजगी क्षेत्रातील कामगारांना कामावर जावं लागत असल्यानं आणि त्यांना स्वतःची तसंच त्यांच्या कुटुंबियांची काळजी घेण्याची संधी मिळत नसल्यानं हे कामगार बरेच नाराज आहेत. आर्थिक व्यवहार सुरू राहावेत हे जरी खरं असलं, तरी खाजगी क्षेत्रातील कामगारांना कोणत्याही पद्धतीची सुरक्षा नसल्यानं त्यांना पूर्णतः त्यांच्या व्यवस्थापनावर सोडून सरकार त्यांच्या जीवाकडे खेळ करीत असल्याची टीका कामगार संघटनांनी केली आहे.

कोविड निर्बंधांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई

कोविड निर्बंधाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. अत्यावश्यक सेवेची दुकानं, मासळी मार्केट, रेस्टॉरंट आदी सकाळी 7 ते संध्याकाळी 7 चालू राहतील. किचन मात्र रात्री उशिरापर्यंत चालू ठेवण्याची मुभा देण्यात आलीए. या व्यतिरीक्त पेट्रोलपंप, एटीएम, बांधकाम साहित्य, कृषी साहित्य तसंच अन्य अत्यावश्यक गोष्टींची दुकानं सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत सुरू असतील. लग्न समारंभ उपजिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने 50 लोकांच्या उपस्थितीत पार पाडता येतील. धार्मिकस्थळे लोकांसाठी बंद राहतील. पण मोजक्याच लोकांनी दररोजच्या विधी करता येतील. या व्यतिरीक्त सामाजिक, राजकीय, मनोरंजन, क्रीडा कार्यक्रम बंद राहतील. कॅसिनो, बार आदी बंद राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. सरकारी कार्यालयं 50 टक्के कामगारांच्या हजेरीत सुरू राहणार असंही ते म्हणाले.

लॉकडाऊन नव्हे, कोविड निर्बंध

लोकांचे प्राण वाचवणं हे सरकारचं प्राधान्य आहे, असं म्हणतानाच लोकांना बेड, औषधं आणि ऑक्सिजन मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्न करीत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. कोविडची नवी प्रकरणं कमी करणं आणि मृत्यूदर घटवणं हे सरकारसमोरील मोठं आव्हान आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. एवढं करून आम्ही लॉकडाऊन जारी करत नसून कोविड निर्बंध जारी करत आहोत, असं म्हणून त्यांनी आपली पत्रकार परिषद आटोपती घेतली. या एकंदर पत्रकार परिषदेतून सरकारने लॉकडाऊन या शब्दाचा बराच धसका घेतलेला स्पष्टपणे दिसून येत होता.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!