लॉकडाऊन केलं, पण ‘चावी’ करायला विसरले!

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेत अनेक कच्चे दुवे

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कोरोना आटोक्यात येत नाही, हे पाहून शेवटी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विकेंड लॉकडाऊनची घोषणा केली. मात्र या घोषणेत असे अनेक कच्चे दुवे आहेत, ज्यामुळे लॉकडाऊनच्या यशस्वीतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी टाळेबंदीची घोषणा तर केली, मात्र चावी करायला विसरले, अशी स्थिती निर्माण झालीय.

औद्योगिक कामगारांचं काय?

औद्योगिक आस्थापनं लॉकडाऊनमधून वगळलीत. मात्र सार्वजनिक वाहतूक बंद आहे. अशा स्थितीत कामगारांनी प्रवास कसा करावा, याचा विचार सरकारनं केलेला नाही. बहुसंख्य असंघटित कामगारांकडे विशेषत: महिलांकडे खासगी वाहन नसतं. त्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचाच आधार असतो. त्यामुळे त्यांची अडचण सरकारनं समजून घ्यायला हवी होती. या कामगारांच्या प्रवासाची जबाबदारी कारखान्याच्या मालकांवर ढकलून सरकारनं कामगारांच्या अडचणी वाढवल्याची भावना व्यक्त होतेय.

दुकानं चालू, लॉकडाऊन सुरू हे कसं?

लॉकडाऊन म्हणजे घराबाहेर न पडणं. परंतु जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरू राहणार. या वस्तू आणण्यासाठी लोकं घराबाहेर पडणार. मग लॉकडाऊनला अर्थ काय उरला, असा सवाल उपस्थित होत आहे.

पर्यटकांनी काय करावं?

राज्याच्या सीमा पूर्णत: बंद केलेल्या नाहीत. त्यामुळे ये-जा सुरू आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर झालं असलं, तरी अनेक देशी-विदेशी पर्यटक गोव्यात आहेत. वाहतूक बंद असल्यामुळे त्यांनी माघारी कसं जावं, याबाबत स्पष्टता नाही. सीमा सुरू आहेत. पर्यटक येऊ शकतात, मग लॉकडाऊन कसलं? असा प्रश्न विचारला जातोय.

वॅक्सिनेशनच्या ठिकाणी नियंत्रण कसं ठेवणार?

18 वर्षांवरील वयोगटासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण 1 मे पासून सुरू होणार आहे. कोरोनाबाबत वाढलेली भीती लक्षात घेता, या लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळणं अपेक्षित आहे. अशा स्थितीत लसीकरणासाठी येणार्‍या लोकांवर नियंत्रण कसं ठेवणार, हा खरा प्रश्न आहे. लसीकरणाला गर्दी झाल्यास त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याबाबत काय उपाययोजना केल्या आहेत, याची माहिती अद्याप दिलेली नाही. मुळात लॉकडाऊन असताना लोक मोठ्या संख्येनं लसीकरणाच्या नावाखाली घराबाहेर पडतील, हे अपेक्षित असताना त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी ठोस माहिती न दिल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!