लॉकडाऊनची वेळ आणू नका!

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचं आवाहन

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

पणजी : कोरोनाची वाढती प्रकरणं ही गंभीर गोष्ट आहेच परंतु लॉकडाऊन हे त्याचं एकमेव उत्तर असू शकत नाही. लोकांनी स्वेच्छेने सर्व सुरक्षेचे नियम पाळले तर या विषाणूंचा प्रसार रोखण्यात मदत होईल. लोकांनीच आपल्या कृतीतून राज्यावर लॉकडाऊनची वेळ आणू नये,असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी केलंय. राज्य आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाच्या तातडीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते. बुधवारपासून सामाजिक अंतर, मास्कचा वापर तसेच अन्य मार्गदर्शक तत्वांच्या काटेकोर पालनावर बारीक नजर ठेवणार असून उल्लंघनकर्त्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

लसीकरण महत्वाचे

सर्वांत पहिली गोष्ट म्हणजे 45 वर्षांवरील प्रत्येक नागरीकाने लसीकरण करून घ्यावे,असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. लोकप्रतिनिधींनी यासाठी पुढाकार घ्यावा असे सांगून आपल्या मतदारसंघातील प्रत्येक पात्र व्यक्तीचा शोध काढून त्याचे लसीकरण करवून घ्यावे,असेही ते म्हणाले. ठिकठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलीत. हवं तर नागरीकांना वाहतूकीची सोय करा पण लसीकरण करवून घ्या,असंही ते म्हणाले. आत्तापर्यंत 1.13 लाख लोकांनी पहिला डोस घेतलाय. राज्यभरात 62 केंद्रात लसीकरण मोहीम सुरू आहे.

144 कलम घेतले मागे

कोरोनासंबंधी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांची कठोरतेने कार्यवाही केली जाईल. खुल्या जागेत 200 पेक्षा अधिक लोकांना जमता येणार नाही. लग्न समारंभ, तसेच सभागृहातील कार्यक्रमांना 50 पेक्षा अधिक लोकांनी उपस्थिती लावू नये,असेही सुचविण्यात आलंय. लोकांनी गर्दी टाळावी. खाजगी कार्यक्रमांना 50 ते 100 लोकांनाच प्रवेश द्या,असेही त्यांनी सांगितले. एवढे करून सरकारने 144 कलम मात्र मागे घेतलंय. उघडपणे या कलमाची सरकार आणि सत्ताधारी पक्षाकडूनच पालमल्ली सुरू असल्याने विरोधकांनी सरकारला चांगलेच फैलावर घेतले होते. याचा परिणाम म्हणून अखेर हे कलम दोन्ही जिल्ह्यांतून मागे घेण्यात आलंय. नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. पर्यटकांनाही मास्कच्या वापराची तसेच सामाजिक अंतर राखण्याची सक्ती केली जाईल,असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कोविड केअर सेंटर, किट उपलब्ध

कोरोनाची लक्षणे असलेल्या आणि विषाणूंची लागण झालेल्यांनी कोविड केअर सेंटरचा लाभ घ्यावा तसेच लक्षणेविरहीत लोकांनी कोरोना किटचा वापर करावा,असे आवाहन सरकारनं केलंय. पोलिस आणि जिल्हाधिकारी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलीए.

सक्रीय रूग्णांचा आकडा अडीच हजारांच्या नजीक

राज्यात गेल्या 24 तासांत 387 नवे रूग्ण सापडल्याने सरकारी यंत्रणेची झोप उडालीय. एकाच्या मृत्यूची नोंद झालीय. सक्रीय रूग्णांचा आकडा 2471 झालाय. एकूण 2809 चाचण्यांचे अहवाल अद्यापही येणे बाकी आहेत. 95 रूग्ण बरे झालेत तर नवे 70 रूग्ण इस्पितळात दाखल झालेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!