राज्यातल्या आदीवासी विद्यार्थ्यांना सरकार देणार मोबाईलसाठी कर्ज

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : गोवा राज्य अनुसूचित जमाती वित्त आणि विकास महामंडळातर्फे (जीएसएसटीएफडीसीएल) लघु मुदत कर्ज योजनेंतर्गत अनुसूचित जमात समुदायात (आदीवासी) गरजू विद्यार्थी (आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग) आता शैक्षणिक हेतूसाठी मोबाईल व वायफाय जोडणी विकत घेऊ शकतात.
गोवा राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्ग सुरू केले आहेत. ग्रामीण भागातील आदीवासी समुदायातील अनेक विद्यार्थी ऑनलाईन वर्गांना उपस्थित राहू शकत नाहीत, कारण या ऑनलाईन वर्गांना उपस्थित राहण्यासाठी किंवा ऑनलाईन उपलब्ध असलेली शैक्षणिक माहिती पाहण्यासाठी आवश्क असलेला स्मार्टफोन व वायफाय जोडणी विकत घेणे त्यांना परवडत नाही, असे दिसून आले आहे.
ही योजना आदीवासी समुदायातील गरजू विद्यार्थ्यांसाठी (आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग) उपलब्ध आहे, कर्जाची रक्कम ही फक्त शैक्षणिक हेतूसाठी मोबाईल व वायफाय जोडणी विकत घेण्यासाठी देण्यात येईल, कमाल रक्कम रू. 15 हजार आहे. कर्जाची रक्कम ही विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थिती पाहून समितीतर्फे मान्य करण्यात येईल.
अधिक माहितीसीठी, विद्यार्थ्यांनी दुर्गादास गावडे, अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक व सर्व संचालक यांच्याशी संपर्क साधावा, असे माहिती व प्रसिद्धी खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.