दारूविक्री दुकानांना आता पाच वर्षांसाठी परवाना नूतनीकरण

परवाना शुल्कातही होणार कपात

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजी : महसूल वाढीच्या दृष्टीने गोवा सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. दारुच्या दुकानांसाठी आता एकदम पाच वर्षांच्या काळासाठी परवाना नूतनीकरण करण्यास मिळणार आहे. आधी दारुच्या दुकानांसाठीचा दरवर्षी परवाना नूतनीकरण बंधनकारक होतं. जे परवानाधारक आहेत त्यांना शुल्कात सूटही जाहीर करण्यात आलीय.

गोव्यात सगळ्या प्रकारच्या दारु विक्रीचे सुमारे 12 हजार परवाने आहेत. या माध्यमातून सरकारला 50 कोटींपेक्षा जास्त महसूल प्राप्त होतो. सरकारनं पहिल्यांदाच पाच वर्षांसाठीच्या परवाना नूतनीकरणासाठी मान्यता दिली आहे.

गोवा,दमण आणि दिव अबकारी कर कायदा 1964तल्या नियम 43मध्ये दुरुस्ती करुन अबकारी आयुक्तांना 5 वर्षांच्या काळासाठी परवाना नूतनीकरणाचे अधिकार दिलेत. तसच शुल्कात जी सूट देण्यात आली आहे त्यात 2021-22 ते 2023-24 पर्यंतच्या कालावधीत जे नूतनीकरण करतील त्यांना 5 टक्के आणि 2021-22 ते 2025-26 पर्यंतच्या कालावधीत जे नूतनीकरण करतील त्यांना 10 टक्के शुल्क परतावा मिळणार आहे. पण त्यासाठी 21 मार्च 2021पर्यंत नूतनीकरण शुल्क भरावं लागणार आहे.

एकदा शुल्क भरल्यानंतर जोपर्यंत परवाना वैध आहे, त्या कालावधीत परवाना शुल्क वाढ किंवा शुल्क कपात झाली, तर आगाऊ रक्कम भरणाऱ्याना ती लागू होणार नाही.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!