हणखणेत विजेचा लपंडाव ; ऑनलाईन शिक्षणात व्यत्यय

Goan Varta Live | प्रतिनिधी
पेडणे : गेले आठ महिने हणखणे गावात विजेची समस्या आहे. त्यामुळं नागरिकात मोठी नाराजी दिसते. सध्या शालेय शिक्षण ऑनलाइन पद्धतीने असल्यामुळे वीज अत्यावशक झाली आहे. त्यामुळे याचा त्रास मुलांना सुद्धा होताना दिसतोय. गावातील व्यापाऱ्यांनाही मोठा फटका बसलेला दिसतो. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मिशन फॉर लोकल संघटनेचे अध्यक्ष राजन कोरगावकर आणि त्यांचे कार्यकर्ते तसेच हणखणे गावातील ग्रामस्थांनी पेडणे वीज उपअभियंता दामोदर तारी यांच्याकडे निवेदन दिलं.
गेल्या आठ महिन्यात हणखणे गावात अनियमित वीज आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागतो. वीज नसल्यामुळे अनेकांचे धंदे ठप्प होतात. अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून ही समस्या सोडवावी, अशी विनंती मिशन फॉर लोकल संघटनेचे अध्यक्ष राजन कोरगावकर यांनी केली.
आदर्श गावाचा सन्मान दिलेल्या हणखणे गावात वीज समस्येवर तोडगा मात्र निघत नाही. गेले कित्येक दिवस अनियमित वीज आहे. सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. ऑनलाइन परीक्षा घेतल्या जात आहे आणि अशा स्थितीत वीज जाऊन येथील मुलं समस्येच्या जात्याखाली भरडली जात आहेत, असे हणखणे गावातील स्थानिक गुरुदास कालेकर यांनी म्हटलंय. दरम्यान, या सगळ्याला निव्वळ स्थानिक आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हेच कारणीभूत आहेत. त्यांनी जर यात लक्ष घातला असता तर ही समस्या ओढवली नसती, असा आरोप मिशन फॉर लोकलचे प्रवक्ते राजू नर्से यांनी केलाय.