चला, ‘हिंदु रक्षा’ अधिवेशनात निर्धाराने संघकार्य वाढवण्याचा संकल्प करूया

भारतमाता की जय संघाचे सरसंघचालक सुभाष वेलिंगकरांचं कार्यकर्त्यांना आवाहन

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः गोव्यातील संघाची पहिली शाखा पणजीच्या श्रीमहालक्ष्मी मंदिराच्या पटांगणात लागली. त्या पहिल्या शाखेचा स्वयंसेवक बनण्याचं भाग्य मला लाभलं. आणि आयुष्य एकदम पार बदलून गेलं! जीवन जगण्याचा सामाजिक आणि राष्ट्रीय दृष्टिकोन मिळाला! जून 1962 मध्ये गोव्याचं संघकाम सुरू झालं. त्याला येत्या जून 2022 मध्ये 60 वर्षं पूर्ण होतात. म्हणजे गोव्यातील संघकामाची षष्ठ्यब्दिपूर्ति!

हेही वाचाः धारबांदोड्याच्या विकासासाठी सरकार वचनबद्ध: मुख्यमंत्री

गोव्याच्या संघकामाची 50-पूर्ति, 2012 साली आम्हाला साजरी करू देण्याच्या बाबतीत, विषय एक वर्षभर रेटूनही, का कुणास ठाऊक, नव-रचित कोकण प्रांताने दुर्दैवी निरुत्साह दाखवला, नव्हे मोडता घातला! गोवा विभाग हा प्रांतातील अन्य विभागांपेक्षा राजकीय दृष्टीने जरा वेगळा आहे; गोवा क्षेत्रफळाने छोटा असला, तरी हे प्रशासकीयदृष्ट्या, 40 आमदार, 3 खासदार आणि स्वतंत्र मंत्रिमंडळ असलेलं एक राज्य आहे, ही वस्तुस्थिती जाणून, त्याचं कार्यालय (इमारतीसह दफ्तर) परिपूर्ण आणि तंत्रज्ञानदृष्ट्या अद्यावत असावं, त्यात डिजिटल जाण असलेला एक पगारी कर्मचारी घेण्याची परवानगी प्रांताने गोव्याला द्यावी, असा आमचा प्रस्ताव होता. तो फेटाळून तर लावलाच, परंतु मी संघचालक, संजय वालावलकर कार्यवाह, अवधुत कामत सहकार्यवाह, रत्नाकर लेले प्रांत महाविद्यालयीन प्रमुख, प्रविण नेसवणकर सदस्य अशा आम्हा गोंयकारांना मुंबईला प्रांतीय बैठकीत वेगळं बोलावून तत्कालिन प्रांतप्रचारक शरदराव खाडिलकर यांनी सहप्रांतप्रचारक रवीजी किरकोळे यांच्या उपस्थितीत आमची अत्यंत अपमानास्पद खरडपट्टी काढली होती. वालावलकर, लेलेंनी नंतर या प्रकाराचा निषेधही नोंदवला होता.

हेही वाचाः RBI कडून बँक लॉकर्सच्या नियमांत महत्त्वाचे बदल

आमची चंपी आणि खरडपट्टी करेसारखा कोणता गुन्हा आम्ही गोवा विभागाने केला होता हे आम्हाला शेवटपर्यंत कळलं नाही. बैठक सोडून निघून जाण्याचा विचार डोक्यात आला होता. परंतु तो दाबून आम्ही बैठक संपेपर्यंत थांबलो.

विषय अशाकरता आला, की आमची संघकामाची 50- पूर्ति त्यामुळे हुकली होती. 50-पूर्तिचा आमच्या कार्यवाढीच्या दृष्टीने प्रोत्साहक आणि प्रेरक असलेला मुद्दाच कोकण प्रांताने सहजपणे बेदखल करून टाकला होता.

हेही वाचाः दोन्ही डोस पूर्ण, तरीही अमोल कोल्हेंना कोरोनाची लागण

आता तर 60 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने तरी कार्यवाढीसाठी मुसंडी मारण्याचं आपल्या ‘भारतमाता की जय’ संघाने ठरवलं आहे! संकटे, राजकीय सत्तेच्या सक्रीय पाठिंब्याने मुद्दाम निर्माण करण्यात येणारे अडथळे, सूड, धमक्या, दहशत, जबरदस्ती या सगळ्यांना पुरून उरून, प.पू. डाॅ. हेडगेवार, प.पू.श्रीगुरुजी, पू.बाळासाहेब देवरस यांचा आदर्श, तंत्र आणि विचारांनुसार निष्ठेने, निर्धाराने संघकार्य वाढवण्याचा संकल्प, 22 ऑगस्टच्या तुम्हा कार्यकर्ते आणि सहानुभूतांच्या उपस्थितीत “हिंदु रक्षा अधिवेशनात” आम्हाला करायचा आहे!

हेही वाचाः PHOTO STORY | मासेच मासे चोहीकडे

गोव्याच्या संघकामाची साठी आणि प.पू. डाॅक्टरांनी निर्मिलेल्या आपल्या संघाची स्थापना-शताब्दी आणखी 4 वर्षांनी, 2025 साली संपन्न होतेय. या संघायुष्यातील ऐतिहासिक घटनांना साजेसा संकल्प, आपण 4 वर्षाच्या कालावधीकरता, या अधिवेशनात करणार आहोत.

सुभाष भास्कर वेलिंगकर
राज्य संघचालक, भारतमाता की जय संघ, गोवा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!