लाखेरेत बायो मेथानिसेशन प्रकल्पाची पायाभरणी

सभापती राजेश पाटणेकरांच्या हस्ते कार्यक्रम; 2 कोटी रुपये खर्चून प्रकल्प सुरू

विनायक सामंत | प्रतिनिधी

डिचोलीः लाखेरे डिचोली येथे सभापती राजेश पाटणेकर यांच्या हस्ते शुक्रवारी बायो मेथानिसेशन प्रकल्पाच्या पायाभरणी कार्यक्रम पार पडला. जवळपास २ कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प बांधण्यात येत आहे. त्यापैकी १३३ लाख रूपये प्रकल्पासाठी, तर उरलेले ८८.६८ लाख रूपये हे त्या प्रकल्पाच्या ५ वर्षांपर्यंत देखरेखीसाठी वापरण्यात येणार आहेत.

बहुउपयोगी प्रकल्प

हा प्रकल्प बहुउपयोगी आहे. त्यामुळे डिचोलीवासियांना याचा खूप फायदा होणार आहे, असं सभापती राजेश पाटणेकर यावेळी म्हणाले. माजी नगराध्यक्ष सतीश गांवकर यांनी डिचोली नगरपालिका ही सुरुवातीपासूनच काचरा समस्येविषयी जागरूक आहे आणि आपल्या कार्यकाळात हा प्रकल्प मान्य झाला होता अशी माहिती दिली.

प्रकल्पात ५ टीपीडीपर्यंत कचरा नष्ट करण्याची क्षमता

आतापर्यंत सुक्या कचऱ्याची आम्ही विल्हेवाट लावत होतो. जवळपास ३.५ टीपीडी ओला कचरा नष्ट करत होतो. आता या बायो मेथानिसेशन प्रकल्पामुळे डिचोली नगरपालिका ५ टीपीडीपर्यंत कचरा नष्ट करू शकते, ज्याचा फायदा शेजारील गावांनादेखील मिळेल. तसंच भटक्या, मेलेल्या जनावरांची विलेव्हाट लावण्यासाठी अजून एक प्रकल्प आम्ही सुरू करणार आहोत, अशी डिचोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी कबीर शिरगावकर यांनी यावेळी दिली.

दर दिवशी ३०० युनिट विजनिर्मिती होणार

हा प्रकल्प जवळपास ३०० युनिट दर दिवशी प्रमाणे विजनिर्मिती करू शकतो. तसंच खत निर्मितीदेखील करू शकतो. सध्या कचरा प्रकल्पाला साधारण २५० युनिट प्रति दिवसाप्रमाणे विजनिर्मिती लागते. हा प्रकल्प आल्यावर नगरपालिकेवरचा ताण कमी होईल अशी आशा बायो मेथानिसेशन प्रकल्पाचे अभियंता गौरव पोकळे यांनी व्यक्त केली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!