इथेनॉल उत्पादन-वितरणासाठी ‘ई-100’ पथदर्शी प्रकल्पाचा पुण्यामध्ये प्रारंभ

पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल ब्लेंडिंगचे लक्ष्य साध्य करण्याचा कालावधी 2025 पर्यंत आणला जवळ

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त केले. पंतप्रधानांनी भारतातील इथेनॉल ब्लेंडिंग 2020-2025 साठी आराखड्याबाबतच्या तज्ञ समितीच्या अहवालाचे यावेळी प्रकाशन केले. यावेळी पंतप्रधानांनी देशभरात इथेनॉलचे उत्पादन आणि वितरण करण्यासाठी ई-100 या महत्त्वाकांक्षी पथदर्शी प्रकल्पाचा पुण्यामध्ये प्रारंभ केला. “चांगल्या पर्यावरणासाठी जैवइंधनांना प्रोत्साहन” ही यंदाच्या कार्यक्रमाची संकल्पना आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी, नरेंद्र सिंग तोमर, प्रकाश जावडेकर, पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान देखील उपस्थित होते.

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने भारताने इथेनॉल क्षेत्राच्या विकासाचा सविस्तर आराखडा सादर करून आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. इथेनॉल हे 21 व्या शतकातील भारतासाठी प्राधान्याच्या घटकांपैकी एक बनले आहे, असे ते म्हणाले. इथेनॉलवर भर दिल्यामुळे पर्यावरणावर चांगला परिणाम होण्याबरोबरच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल ब्लेंडींग करण्याचे लक्ष्य 2025 पर्यंत साध्य करण्याचा सरकारचा निर्धार आहे. यापूर्वी हे लक्ष्य 2030 पर्यंत निर्धारित करण्यात आले होते. 2014 पर्यंत सरासरी केवळ 1.5 टक्के इथेनॉल ब्लेंडींग होत होते ते आता 8.5 टक्क्यांवर गेले आहे. 2013-14 मध्ये देशात सुमारे 38 कोटी लीटर इथेनॉल खरेदी केले जात होते, आता त्याचे प्रमाण 320 कोटी लीटरपर्यंत पोहोचले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. इथेनॉल खरेदीमध्ये झालेल्या या आठपट वाढीमुळे देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे, असे त्यांनी सांगितले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!