केपेत ‘पीक विमा सप्ताहा’चा शुभारंभ

उपमुख्यमंत्री तथा कृषिमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकरांनी दाखवला हिरवा झेंडा

Goan Varta Live | प्रतिनिधी

केपेः उपमुख्यमंत्री तथा कृषिमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांच्याहस्ते केपे येथील नगरपालिका सभागृहात ‘पीक विमा व पीएमएफबीवाय योजना सप्ताह’ कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्यांनी माहिती, शिक्षण आणि दळणवळण व्हॅनला हिरवा झेंडा दाखविला. हे वाहन पंतप्रधान फसल विमा योजनेची (पीएमएफबीवाय) जागृती करणार आहे.

हेही वाचाः सरकारची सकारात्मक प्रतिमा तयार करा

योजना प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत

यावेळी बोलताना कवळेकर यांनी शेतीद्वारे राज्य स्वयंपूर्ण बनविण्यासाठी आपल्या सरकारने आणि कृषी खात्याने केलेल्या प्रयत्नांचा पुनरुच्चार केला. त्यांनी विविध कारणांमुळे शेतकऱ्यांचं पीक नष्ट होतं तेव्हा त्यांना संरक्षण देणं आणि त्यांना आर्थिक मदत देणं हा पीएमएफबीवाय योजनेचा उद्देश असल्याचं सांगितलं. योजना प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि कृषी खातं त्या दिशेने अथक परिश्रम घेत असल्याचं ते म्हणाले.

युवकांनी विविध कृषी योजनांचा लाभ घ्यावा

शेतकर्‍यांच्या हितासाठी सध्याच्या कठीण महामारीच्या परिस्थितीत शेतात काम केल्याबद्दल त्यांनी कृषी खात्याच्या कर्मचार्‍यांची प्रशंसा केली. युवकांनी विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन करून त्यांनी सामुदायिक शेती ही कृषी खात्याची एक उत्तम योजना असल्याचं सांगितलं.

हेही वाचाः सलग दुसऱ्या दिवशी राज्यात 6 रुग्ण दगावले!

राज्यात ग्रामपंचायतींच्या पातळीवर पीएमएफबीवाय योजना राबविली जातेय

कृषी संचालनालयाचे संचालक नेव्हिल अल्फोन्सो यांनी पीएमएफबीवाय योजना आणि खात्याच्या इतर अनेक योजनांची माहिती दिली. तसंच शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं. पिकांचं नुकसान होण्याची जोखीम पीएमएफबीवाय योजनेंतर्गत सामावून घेण्यात आल्याचं त्यानी सांगितलं. खरीप २०२१च्या हंगामापासून राज्यात ग्रामपंचायतींच्या पातळीवर पीएमएफबीवाय योजना राबविली जात आहे. गारपीट, पूर, चक्रीवादळ, मुसळधार आणि अवेळी पाऊस, रोगाचा आणि कीटकांचा हल्ला इत्यादी नैसर्गिक आपत्तींमुळे उद्भवलेल्या पिकांचं नुकसान किंवा नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना आर्थिक सहाय्य देऊन शेतीत सक्षम उत्पादनास आधार देणं हा या योजनेचा उदेदेश आहे. भात, डाळी, भुईमूग आणि ऊस ही या योजनेंतर्गत येणारी चार प्रमुख पिकं आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!