शेकोटी संमेलनांतून भाषासंवर्धनाचं कार्य – गुलाब वेर्णेकर

कोकण मराठी परिषद, गोवा आयोजित सोळावं शेकोटी साहित्य संमेलन ब्रह्माकरमळीत संपन्न.

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

वाळपईः कोकण मराठी परिषदेचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणजे “शेकोटी संमेलन’. असंच एक शेकोटी संमेलन नुकतंच निसर्गाचा कुशीत आयोजित करण्यात आलेलं. वाळपईच्या ब्रह्माकर्मळीत शनिवारी रात्री कोकण मराठी परिषद, गोवाची शेकोटी चांगलीच रंगली. शेकोटी हे ज्योतितत्त्वाचं प्रतीक. शेकोटी ही ऊर्जा. ती शिखररूप आहे. हे ज्योतिर्मुख ज्वालामुखीसारखं आहे. अनिष्ट नष्ट करण्याचं सामर्थ्य तिच्यात आहे. समाजातील परिवर्तनाची ती प्रेरणास्त्रोत आहे. शिवाय ती शे – कोटी आहे. शेकडो असलेले कोट्यवधी करण्याची – म्हणजे शतगुणित करण्याची ताकद तिच्यात आहे.

“तमसो मा ज्योतिर्मगमय’ हा मूलमंत्र घेऊन कोकण मराठी परिषद, गोवा आयोजित सोळावं शेकोटी साहित्य संमेलन ब्रह्माकरमळी येथील श्री ब्रह्मदेव देवस्थानच्या प्रांगणात संपन्न झालं. यावेळी साहित्य वर्तुळातील अनेक मान्यवरांची उपस्थिती पहायला मिळाली. शेकोटी साहित्य संमेलनातून भाषासंवर्धनाचं कार्य होत असतं, असं गोमंतकीय साहित्यिक गुलाब वेर्णेकर यांनी यावेळी सांगितलं. नामवंत भजन कलाकार पांडुरंग राऊळ यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं.

विविध मान्यवरांची उपस्थिती

गोमंतक मराठी साहित्य परिषदेच्या सहकार्याने पार पडलेल्या कोकण मराठी परिषद, गोवाच्या १६ व्या शेकोटी संमेलनात अनेक मान्यवरांची उपस्थिती पहायला मिळाली. या वेळी ‘को.म.प.’चे अध्यक्ष सुदेश आर्लेकर, प्रमुख वक्ता ॲड. भालचंद्र मयेकर, गोमंतक मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष संदीप केळकर, देवस्थानचे अध्यक्ष पराग खाडीलकर, संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रेमानंद नाईक, प्रमुख कार्यवाह म्हाळू गावस, कार्यवाह मिलिंद गाडगीळ, दुसरे कार्यवाह सर्वेश केळकर, विशेष निमंत्रित नारायण राठवड, अभय सामंत, डॉ. श्वेता गावस यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

लेखकमंडळी-कलाकारांसाठी एक प्रभावी ऊर्जास्रोत

कोकण मराठी परिषद, गोवाच्या १६ व्या शेकोटी संमेलनाला उद्घाटक म्हणून पांडुरंग राऊळ उपस्थित होते. आपल्या भाषणात बोलताना ते म्हणाले, लोकजीवनात साहित्यिक आणि कलाकार यांचा घनिष्ट संबंध आहे. फरक एवढाच आहे, की कलाकार स्वरांच्या माध्यमातून अभिव्यक्ती करतो, तर साहित्यिक अक्षरांच्या माध्यमातून प्रसवत असतो. शेकोटी संमेलनं ही लेखकमंडळी तसंच कलाकारांसाठी एक प्रकारचा प्रभावी ऊर्जास्रोत असतो.

मराठी भाषेत व्यवहार करायलाच हवा

कोकण मराठी परिषद, गोवाच्या १६ व्या शेकोटी संमेलनाच्या अध्यक्ष गुलाब वेर्णेकर यांनी यावेळी पाश्चात्य संस्कृतीवर टीका केली. त्या म्हणाल्या, इंग्रजी भाषा ही बहुतांश लोकांची रोजगाराची भाषा असली तरी ती आपल्या हृदयाची भाषा नाही. आज आर्थिक व्यवहाराला जास्त महत्त्व प्राप्त झाल्यामुळे मुलं इंग्रजी शिकतात; पण, पर्याय आपण शोधून काढले पाहिजेत. मराठी भाषेत व्यवहार करायलाच हवा. पालकांनी मुलांशी मराठी भाषेतून बोललं पाहिजे. आपल्या आचारविचारांत मराठी भाषा दिसायला हवी. फक्त शाळेत शिकवून भाषा समृद्ध होत नसते. आपले ग्रंथ ज्ञानेश्वरी, रामायण, महाभारत, शिवाय मनाचे श्लोक यांचं महत्त्व आपण आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे. नाटक, चित्रपट, लोककला, वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या यांनी मराठी जनमानसापर्यंत पोहोचवण्याचं कार्य आजवर केलं आहे. भाषा हे व्यक्त होण्याचं साधन असल्यामुळे ज्ञानसंचित भाषेतून जनमानसाच्या हृदयापर्यंत पोहोचलं पाहिजे. साहित्यातून समाजाचं चित्रण, जगण्याचं चित्रण मांडलं पाहिजे.

विविध क्षेत्रांतील ३१ व्यक्तींचा सत्कार

या संमेलनात विविध क्षेत्रांतील ३१ व्यक्तींचा सत्कार करण्यात आला:- रुक्मिणी गोविंद धुरी, लक्ष्मी नारायण मावळंगकर, किशोर अनंत केळकर, प्राजक्ता गावकर, नारायण राघोबा सावंत, नारायण दीपक धुरी, अजित यशवंतराव देसाई, गोविंद बाबलो च्यारी, प्रकाश लक्ष्मण दळवी, आप्पासाहेब विठ्ठलराव देसाई, नीलेश चंद्रकांत शेळपकर, दत्ता कृष्णा पिंगूळकर, पांडुरंग यशवंत सावंत, महादेव रामा दळवी, काशिनाथ महादेव गावडे, यशवंत राघोबा सावंत, मंगलदास बाबणी शेळपकर, रोहिदास गावकर, वामनराव संतोबा देसाई, लक्ष्मण विष्णू गाडगीळ, सखाराम नानासाहेब देसाई, हरी पांडुरंग काकतकर, बाबल्यानंद भैरो झोरे, अरविंद नानासाहेब देसाई, दीपक गोविंद धुरी, अमितकुमार आप्पासाहेब देसाई, जयसिंग गोविंद देसाई, लवचंद्र बाबणी शेळपकर, रोहन रामराव देसाई, श्रीधर नाईक, सुदेश तिवरेकर. सत्कारमूर्तींना शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प तसंच मानपत्र प्रदान करण्यात आलं. तसंच संमेलनाध्यक्ष गुलाब वेर्णेकर व उद्‍घाटक पांडुरंग राऊळ यांचा सन्मान ॲड. भालचंद्र मयेकर यांच्या हस्ते करण्यात आला. निवासी स्वरूपाच्या या संमेलनास सुमारे दीडशे साहित्यप्रेमींची उपस्थिती होती. नामवंत गोमंतकीय साहित्यिकांप्रमाणेच नवोदितांचाही या संमेलनात मोठ्या संख्येने सहभाग होता.

साहित्यदिंडीने या संमेलनाचा प्रारंभ झाला. उद्घाटन सत्राचं सूत्रनिवेदन सोनल नावेलकर हिने केलं. सत्रप्रमुख म्हणून विजय बा. नाईक यांनी जबाबदारी सांभाळली. त्यानंतर बौद्धिक सत्रांतर्गत ‘योगविद्या : जीवनाचा राजमार्ग’ या विषयावर नारायण राठवड मार्गदर्शन केलं. त्या सत्राच्या अंतर्गत प्रशांत नाईक यांनी विषयतज्ज्ञाचं स्वागत केलं. या वेळी स्वतेजा प्रेमानंद कुंभार, सुशांत गावस, गुरुदास गावकर, उमेश बोरकर व प्रेमानंद कुंभार यांचा सहभाग असलेला बहारदार संगीत कार्यक्रम झाल्या. त्यानंतर कवयित्री गौतमी गावस-चोर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निमंत्रितांच्या कविसंमेलनाच्या गोव्यातील कवींनी स्वरचित कविता सादर केल्या. त्यामध्ये ॲड. भालचंद्र मयेकर, हिरा गावकर, सोनल नावेलकर, डॉ. श्वेता गावस, प्रकाश ढवण, अविनाश जाधव, अशोक घाडी, दामोदर मळीक, वासुदेव गावकर, संदीप केळकर, यशवंत परवार, म्हाळू गावस तसंच संमेलनाध्यक्ष गुलाब वेर्णेकर यांचा सहभाग होता. दुसऱ्या दिवशी सकाळी चाफा कविसंमेलन व त्यानंतर संमेलनाचं समारोप सत्र झालं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!