आमच्या जमीन मालकीचा प्रश्न सोडवा !

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी
वाळपई : सत्तरी तालुक्यात वर्षानुवर्षे कायम राहिलेला जमीन मालकीचा प्रश्न राज्य सरकारने तातडीने सोडवावा. हा प्रश्न वेळीच मार्गी लागला असता, तर आज मेळावलीवासीयांनी आयआयटीला विरोध केलाच नसता. या विषयाकडे लोकप्रतिनिधींनी तत्परतेने लक्ष द्यावे, अशी मागणी सत्तरी शेतकरी भूमिपुत्रांनी केली आहे.
वेळुस येथील सातेरी-ब्राह्मणी मंदिरात या विषयी चर्चा करण्यासाठी खास बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकर्यांनी आपली मते व्यक्त केली. सत्तरी तालुक्यात गोवा मुक्तीनंतर आजही जमीन मालकीचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामागे राजकीय अनास्था हेच कारण आहे. विधानसभेत जर मालकी या विषयाबाबत ठराव संमत केला तर मालकी विषय सुटणारा आहे. पण आजपावेतो या गंभीर विषयाकडे राजकीय पुढार्यांनी जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सत्तरी तालुक्यातील कष्टकरी भुमिपूत्र तीव्र नाराज आहेत. सद्या गुळेली पंचायत क्षेत्रातील मेळावली गावात होऊ घातलेल्या आयआयटी विरोधात स्थानिकांनी आंदोलन छेडले आहे. जमीन मालकीचा प्रश्न आधी सोडवा व नंतरच आयआयटीचा विचार सरकारने करावा, अशी तेथील लोकांची मागणी आहे. जर जमीन मालकीचा विषय सुटला असता तर मेळावलीवासीयांनी या संस्थेला विरोध केला नसता, असा सूर यावेळी व्यक्त झाला. या बैठकीला अनेक शेतकरी उपस्थित होते.
शेतकर्यांची बाजू अशी…
१. तार-सोनाळ गावचे रणजीत राणे म्हणाले, मेळावली गावातील लोकांना जमीन मालकी मिळालेली नाही. तरी देखील सरकार तिथे सरकारी जमीन म्हणून सांगून आयआयटी संस्था आणत आहे.
२. मेळावलीतील लोक गेल्या अनेक वर्षांपासून तेथील जमिनीत काजू तसेच अन्य पिके घेऊन उदरनिर्वाह करत आहेत. म्हणूनच सरकारने जर मेळावलीसह अन्य गावांतील जमीन मालकीचा विषय सोडविला असता तर आज वेगळे चित्र दिसले असते.
३. सत्तरीत कुमेरी, अल्वारा, वनहक्क आदी प्रकारच्या जमिनींना मालकी मिळणे आवश्यक आहे.
बैठक प्राथमिक स्वरूपाची होती. जमीन मालकी मिळण्यासाठी भविष्यात कोणती पावले उचलावी लागतील? त्याचे नियोजन कसे करायचे, याबाबत चर्चा करण्यात आली. योग्य नियोजन केल्यानंतरच पुढील पावले टाकण्यात येतील.
– राजेश गावकर, सुरुंगुली ग्रामस्थ
सत्तरी तालुक्यात आमच्यासह अनेक शेतकरी हे पूर्वीपासून जमीन कसून उत्पन्न घेत आहोत. याच मुद्दावर आम्ही कायदेशीर न्याय मागू शकतो. झालेल्या बैठकीत जमीन मालकीसाठी पुढील रणनीती काय असेल, यावर चर्चा करण्यात आली.
– अॅड. गणपत गावकर