सासष्टीतही कागदपत्रांत बेकायदा फेरफार करून जमिनी हडप

फातोर्डा पोलिसांकडून तपास सुरू : मामलेदारांकडून तक्रार

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव: सासष्टीचे मामलेदार प्रतापराव गावकर यांच्याकडे जमिनींच्या मूळ मालकांनी जमिनींची विक्री न करताही भलत्याच व्यक्तींची नावे कागदपत्रांवर लागल्याबाबत आलेल्या तक्रारीनंतर त्यांनी संबंधित फाईल्स तपासल्या. या तपासणीत विक्री करण्यात आलेल्या जमिनींची उपनिबंधकांकडे नोंद नसून त्या जमिनींबाबतच्या फाईल्सही गहाळ असल्याचं दिसून आलं आहे. त्यानंतर फातोर्डा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस जमीन मालकांना नोटीस बजावून चौकशी करत आहेत.

हेही वाचाः गोवा दिवाळखोरीच्या दिशेने चाललायः सुदीन ढवळीकर

सासष्टीतही कागदपत्रांत बेकायदा फेरफार करून जमिनी हडप

बार्देश, तिसवाडी व सत्तरीप्रमाणे सासष्टी तालुक्यातही कागदपत्रांत बेकायदा फेरफार करून जमिनी हडप करण्याचे तसंच विक्री करण्याचे प्रकार घडल्याचं उघडकीस आलं आहे. हे प्रकार फार जुन्या कालावधीतील नसून २०१८ व २०१९ या दोन वर्षांतील असल्याचं सध्या दिसून येत आहे.
एका जमिनीचा विक्री करार (सेलडीड) झाला असला तरी, प्रत्यक्षात तो आपण केलेला नसल्याची माहिती संबंधित जमीन मालकाने मामलेदारांना जानेवारीत दिली होती. या प्रकरणानंतर अन्य जमीन मालकांनी माहितीच्या अधिकाराखाली त्यांच्या जमिनींची कागदपत्रे घेतली होती. त्यामध्ये कागदपत्रांत बेकायदेशीरपणे फेरफार करून जमिनी विकल्या गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं. अशाप्रकारे सासष्टीतून आतापर्यंत १३ जमिनींच्या बाबतीत तक्रारी आल्या आहेत, अशी माहिती मामलेदार प्रतापराव गावकर यांनी दिली.

हेही वाचाः गोंयकार राजकीयदृष्ट्या अत्यंत सूज्ञः अ‍ॅड. नरेंद्र सावईकर

बनावट कागदपत्रांद्वारे जमीन विक्री करार

बनावट कागदपत्रांद्वारे जमीन विक्री करार करण्यात आले. त्यानंतर जमिनी म्युटेशनसाठी टाकण्यात आल्याचे प्रकार उघड झाले. जानेवारी, फेब्रुवारीत याबाबत तक्रारी आल्या. यात कुडतरी परिसरातील ३, कुंकळ्ळीतील दोन, दवर्लीतील दोन, राय परिसरातील दोन, धर्मापूर, सां जुझे अरियाल, उतोर्डा, गौंदावली या परिसरातील प्रत्येकी एका जमिनीचा बनावट विक्री करारनामा करण्यात आल्याचे आढळून आले आहे.

हेही वाचाः चर्च पाडण्यामागे आम आदमीचं सरकार नाही

जमिनींचा विक्री करारनामा चुकीचा असल्यानं ही प्रकरणं घडली

जमिनींचा विक्री करारनामा चुकीचा असल्यानं ही प्रकरणं घडली. विक्री करारनाम्यातील नंबर हा उपनिबंधकांकडे नोंदच नाही. त्यातील एका प्रकरणावर तक्रार आल्यानंतर त्याची दखल घेतली गेली. हे इतर जमीन मालकांना समजल्यावर त्यांनीही म्युटेशन प्रक्रियेवर आक्षेप घेत जमीन विक्रीचा करार चुकीच्या पद्धतीने झाल्याचे कागदपत्रांसह मामलेदार कार्यालयाच्या लक्षात आणून दिले. त्यानंतर आलेल्या १३ तक्रारींच्या फाईल्सचा कार्यालयात शोध घेतला असता, त्या गहाळ असल्याचे लक्षात आले.

हेही वाचाः भारतीय निवडणूक आयोगाच्या बैठकीचा अर्थ काय? विधानसभेची निवडणूक लवकर होणार?

वेगवेगळ्या मामलेदारांच्या स्वाक्षऱ्या

ती १३ प्रकरणं ही एकाच मामलेदाराकडून अंतिम करण्यात आलेली नाहीत, तर त्यात वेगवेगळ्या मामलेदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यामुळे यात कार्यालयातील काही कर्मचारी सहभागी असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येतं. घोटाळा झालेल्या १३ जमिनींपैकी सर्वच फाईल्स गहाळ असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर या प्रकरणी फातोर्डा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

हेही वाचाः ‘लुई बर्जर’ लाचखोरी प्रकरणी कामत, चर्चिल विरोधात चालणार खटला

बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींचे व्यवहार

ज्या जमिनींच्या मूळ मालकाचा मृत्यू झालेला आहे, ज्या जमिनींची देखभाल व कायदेशीर कारवाई करण्यासाठी कुणीही नाही, ज्या जमिनींचे मूळ जमीन मालक हे परदेशात राहतात किंवा स्थायिक झालेले आहेत, अशा जमिनींची खोटी कागदपत्रं आणि बनावट विक्री करारनामा करून त्या हडप करण्याचे तसंच विक्रीचे प्रकार सासष्टीत घडले आहेत. दोन प्रकरणांत तर अगदी कमी कालावधीत दोनवेळा म्युटेशन प्रक्रिया करण्यात आल्याचं समजतं. ४० हजार चौरसमीटर ते लाखो चौरसमीटर जमिनींची ही विक्री असल्याने हा घोटाळा कोट्यवधींच्या घरात जाणारा आहे.

हेही वाचाः गोव्यातील समुद्र किनारी ‘ब्लू बॉटल जेलिफिश’चा धोका

पाच जमिनींचे विक्री करार रद्द!

आतापर्यंत कागदपत्रांच्या तपासणीनंतर जमिनींच्या विक्री प्रकरणांची उपनिबंधक कार्यालयात नोंद नसल्याचं लक्षात आल्यावर पाच प्रकरणांत जमीन मूळ मालकांना परत करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकाऱ्यांकडे जमीन मालकांनी तक्रारी केल्यानंतर त्यांनी कागदपत्रांच्या तपासणीनंतर चार जमिनींबाबतची म्युटेशन प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश काढले आहेत. दरम्यान, एका प्रकरणात आदेश काढून जमीन मूळ मालकाला परत केलेली आहे तर, अजूनही आठ प्रकरणे बाकी आहेत, अशी माहिती मामलेदार प्रतापराव गावकर यांनी दिली.

हेही वाचाः फेसबूकवर मैत्री, मैत्रीतून भेट, भेटीदरम्यान लैंगिक अत्याचार! दोघे संशयित गजाआड

मामलेदार कार्यालयातून १३ फाईल्स गायब

म्युटेशन प्रक्रियेबाबत जमीन विक्री करारनामा, जमीन मालकाचे जमिनीसंबंधित कागदपत्रांवरील नाव या बाबी तपासून संबंधित अधिकाऱ्यांकडून म्युटेशनसाठी प्रक्रियेला मंजुरी दिली जाते. मात्र, आतापर्यंत तक्रारी आलेल्या १३ जमिनींबाबतच्या फाईल्स मामलेदार कार्यालयातून गायब आहेत. या प्रकरणात सहभागी असल्यास कर्मचाऱ्यांना स्वतःहून पुढे येण्याची सूचना करण्यात आली होती. गहाळ फाईल्स कोणाकडे असल्यास चार महिन्यांच्या आत सादर करण्याचीही सूचना केली होती. त्यानंतर फातोर्डा पोलिसांत तक्रार नोंद केली, असे मामलेदार प्रतापराव गावकर यांनी सांगितलं.

हेही वाचाः ‘सीइसी’च्या शिफारशींवर मत दाखल करू : मुख्यमंत्री

फातोर्डा पोलिसांकडून चौकशी सुरू

मामलेदार प्रतापराव गावकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनींच्या विक्रीप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. या फाईल्स कोणी तपासल्या, कोणी अंतिम केल्या व त्यावेळी कोणत्या कर्मचाऱ्यांनी फाईल्स हाताळल्या, कोण कर्मचारी कार्यरत होते, याची माहिती घेण्यात आलेली आहे. काही जमीन मालकांना नोटीस पाठवून म्हणणे सादर करण्यास सांगण्यात आलेलं आहे. अजूनही तपास प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती फातोर्डा पोलीस निरीक्षक कपिल नायक यांनी दिली.

हेही वाचाः Video | Politics | पावसाळी अधिवेशन | खडाजंगी | मॉविन गुदिन्होंच्या वक्तव्यावर विरोधक भडकले

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!