विमानतळासाठी जमिनी, आता लिंक रोडसाठी काजू बागायती जाणार

कासारवर्णेतील तुळस्करवाडीवासियांना मोठा फटका

Goan Varta Live | प्रतिनिधी

पेडणे : मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमिनी गेलेल्या तसेच या विमानतळ परिसरातील अनेक गावांना मोठा फटका बसलाय. आधीच मोठ्या प्रमाणात जमिनी गेल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आता लिंक रोडच्या भूसंपादनाची नवी साडेसाती सतावू लागलीए. कासारवर्णेतील तुळस्करवाडी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी विमानतळासाठी गेल्या आणि आता लिंक रोडसाठी या शेतकऱ्यांच्या काजू बागायती जाणार असल्याने राज्याच्या आणि देशाच्या विकासाचे प्रतिक बनलेला हा विमानतळ या लोकांसाठी मात्र शाप ठरलाय.

भूसंपादन कायदा नाही तर हायवे कायदा लावला

धारगळ सुकेकुळण ते मोपापर्यंत शंभर मीटर रूंदीचा लिंक रोड तयार केला जातोय. या लिंक रोडला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आलाय. आता या लिंक रोडसाठी घाईगडबडीत भूसंपादनाचा डावा आखलाय. लोकांना एकही नोटीस न बजावता केवळ वर्तमानपत्रावर नोटीस प्रसिद्ध करून लोकांच्या जमिनींवर थेट आक्रमण करण्याचा प्रकार राज्य सरकारने केलाय. पोलिस बळ वापरून लोकांना सतावले जात आहे. कुणीही सुशिक्षितांनी प्रश्न केल्यास त्यांच्यावर गुन्हे नोंद केले जाताहेत. सरकारी कर्मचारी असलेल्यांनी तोंड उघडल्यास त्यांना बदल्यांच्या धमक्या दिल्या जाताहेत.

.. प्रसंगी प्राणांची बाजी लावण्याची तयारी

हे सगळे प्रकार लोकांबाबत घडत असताना समाज आणि राज्यातील विरोधी पक्षांकडून या लोकांना कुणाचाच पाठींबा मिळत नसल्याने हे लोक प्रचंड निराश बनलेत. आता शेवटी संयमाचा कडेलोड झाल्यास कायदा हातात घेण्याचे कृत्य त्यांच्याकडून होण्याची शक्यता असून आपली जमिन वाचवण्यासाठी प्रसंगी प्राणांची बाजी लावण्याची तयारी काही लोकांनी केलीय. एरवी म्हणून काजू बागायतींची ही जमिन गेली तर जगण्याचा आधारच जाणार आणि त्यामुळे ही जमिन वाचवण्यासाठी मेलो तरी बेहत्तर, अशी प्रतिक्रिया येथील काही संतप्त स्थानिकांनी व्यक्त केलीए.

यापूर्वी जमिनी गेल्या पण भरपाई नाही

मोपा विमानतळासाठी तुळस्करवाडीतील जमिन संपादन करण्यात आली. ही जमिन देवस्थानच्या नावे होती परंतु जमिनीचा वापर उत्पन्नासाठी येथील स्थानिक करत होते. या जमिनीच्या उत्पन्नातून त्यांची काही प्रमाणात मिळकत होती. आता जमिन गेल्यामुळे उत्पन्नाचे साधन गेले आणि जमिनीची मालकी देवस्थानची असल्यामुळे भरपाई मिळण्याचा प्रश्नच उदभवत नाही. आता लिंक रोडसाठी जी जमिन तुळस्करवाडीतील संपादीत केली जात आहे ती एअरोसिटी प्रकल्पाला सोयीस्कर ठरावी या नियोजनातून आखली जात आहे. यासाठी संपूर्ण तुळस्करवाडीवासियांचे काजू उत्पादन जाणार आहे. या लोकांच्या उदरनिर्वाहाचे आणि मुख्य उत्पन्नाचे स्त्रोत हे काजू उत्पादन असल्याने हीच जमिन घेतली जाणार असल्याने हे लोक बरेच आक्रमक बनलेत.

मुख्यमंत्र्यांनी एकदा तरी भेट द्यावी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी किमान एकदा तरी मोपा भूपिडित सर्वंच गावांना भेट द्यावी. या भेटीत त्यांनी पिडितांचे म्हणणे एकून घ्यावे. मोपा विमानतळाला कुणीच विरोध केला नाही. पण सरकारने स्थानिकांची सुरक्षा जपण्याची जबाबदारी सरकारची आहे. स्थानिक लोकांना उध्वस्त करून विकास करण्याचे धोरण सरकारने राबवले तर भविष्यात गोंयकार नावालाही शिल्लक राहणार नाही. मोपा जमिन संपादनानंतर अद्यापही लोकांना एक पैसाही भरपाई मिळाली नाही. लोकांच्या जमिनींची कागदपत्रे सरकारने मिळवून द्यायला हवी. जमिनींची कागदपत्रे नाहीत, त्यांना या राज्यात काहीच किंमत नाही का, हे देखील सरकारने जाहीर करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाम येथील लोकांना जमिनींची कागदपत्रे देऊन त्यांना त्यांच्या घरांची आणि जमिनींची मालकी मिळवून दिली. ही गोष्ट गोव्यात का होत नाही,असा सवाल या लोकांनी केला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!