खडेबाजार रोडवरील मीना बाजारमधून गोव्याच्या पर्यटकांचे दागिने लंपास

सीसीटीव्ही कॅमेरा बंद अवस्थेत

Goan Varta Live | प्रतिनिधी

बेळगाव: खडेबाजार रोडवरील मीना बाजारमध्ये खरेदीसाठी आलेल्या गोवा येथील दांपत्याचे साडेचार तोळ्यांचे दागिने चोरट्यांनी पळविले आहेत. रविवारी दुपारी ही घटना घडली असून रात्री मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यासंबंधी वास्को – गोवा येथील समीर शेख यांनी मार्केट पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.

अज्ञातांनी दागिन्यांची बॅग पळवली

समीर यांचे कुटुंबीय रविवारी, नातेवाईकांच्या लग्न समारंभासाठी बेळगावला आले होते. त्यानंतर खरेदीसाठी ते खडेबाजार रोडवर पोहोचले. त्यावेळी ही घटना घडली आहे. मीना बाजारमध्ये खरेदी करून पैसे देण्यासाठी ते काऊंटरवर पोहोचले. साडेचार तोळ्याचे दागिने असलेली बॅग काऊंटरवर ठेवून बिल भागवताना अज्ञातांनी दागिन्यांची बॅग पळविली. दुपारी १.२० ते १.३० या केवळ दहा मिनिटांत ही घटना घडली आहे.

सीसीटीव्ही कॅमेरा बंद अवस्थेत

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तातडीने मार्केट पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा असला तरी तो बंद होता. त्यामुळे पोलिसांना फुटेज मिळाले नाहीत. रविवारी रात्री उशिरा यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळशीगेरी, उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!