गोव्यातलं लॉकडाऊन पुन्हा कामगारांच्या मुळावर!

स्थलांतरितांनी पायी चालत धरली घराची वाट…

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : राज्यात गेल्या वर्षीच्या एप्रिल-मे महिन्यात निर्माण झालेली स्थिती आता पुन्हा एकदा बघायला मिळतेय. गोवा सरकारनं चार दिवसांचं लॉकडाऊन जाहीर केलं आणि धास्तावलेल्या स्थलांतरित मजुरांनी घरची वाट धरली. वाहनं मिळत नाहीत. मिळाली तरी दर परवडण्याजोगे नाहीत. त्यामुळे हे मजूर डोक्यावर भार घेऊन पायी चालत निघालेत.

कोरोना आटोक्यात येत नाही, हे पाहून शेवटी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विकेंड लॉकडाऊनची घोषणा केली. गुरुवारी संध्याकाळी 7 ते सोमवारी सकाळी 6 या वेळेत हे लॉकडाऊन लागू असेल. हे लॉकडाऊन वाढण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे हातावर पोट असणारा मजूर धास्तावलाय. उपासमारी होण्याच्या भीतीनं त्यानं परतीची वाट धरली.

लॉकडाऊन वाढवलं, तर काय खाणार..?

गोव्यात राहिलो आणि लॉकडाऊनचा कालावधी वाढला, तर खायचं काय? जगायचं कसं? राहत्या घराचं भाडं भरायचं कसं? असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर आहेत. त्यामुळे या स्थलांतरितांनी घराची वाट धरलीय. किमान गावात जाऊन पेजभात खाऊन दिवस ढकलता येतील, हा विचार करून त्यांनी हा निर्णय घेतलाय.

एक वर्षानंतर पुन्हा तीच स्थिती…

गेल्या वर्षी एप्रिल-मे महिन्यात लॉकडाऊन जाहीर झालं आणि परप्रांतीय कामगारांचे तांडे गावाकडे परतू लागले. कोविडबाधेच्या भीतीनं या कामगारांना कोणी वाहनात घेईना. ज्यांनी वाहन द्यायची तयारी दर्शवली, त्यांनी सांगितलेली भाड्याची रक्कम ऐकून कामगारांच्या तोंडचं पाणी पळालं. आताही परिस्थिती बदललेली नाही. गेल्या वर्षीसारखीच स्थिती पुन्हा एकदा निर्माण झालीय. कामगार कालही पिचलेला होता, आजही पिचलेलाच आहे. त्याच्या जगण्यामरण्याची खंत ना लॉकडाऊन लादणार्‍या सरकारला आहे, ना या कामगारांना राबवून घेणार्‍या धनदांडग्यांना!

पाहा व्हिडिओ…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!