Video | ‘अधिवेशनात जर मराठीत बोललात ना, तर तिथे येऊन निदर्शनं करु’

मराठी भवनासमोर कोकणीप्रेमी एकवटले!

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : भाषावादावरुन कोकणी प्रेमींनी अस्मितादिनानिमित्त जोरदार निदर्शनं केली. यावेळी मराठीमध्ये बोलणाऱ्यांना थेट इशाराच देण्यात आला. तर काहींनी मराठीबद्दल द्वेष नाही, मात्र कोकणीबद्दल चिखलफेक करणाऱ्यांनी विचार करुन बोलावं, असा इशारा देण्यात आला. मराठी भवनासमोर अनेक तरुण-तरुणी एकवटले होते. यावेळी त्यांनी मराठी भवनासमोर निदर्शनं केली. गाणी म्हटली, पोस्टरबाजी केली आणि कोकणीचा द्वेष करणाऱ्यांना चांगलंच फैलावरही घेतलं.

मराठी भवनासमोर प्रतिकात्मक गाढवाला जाळण्यात आलं. मराठी भवनाच्या गेटवरही जय कोकणीचा नारा असलेले पोस्टर लावण्यात आले. इतकंच नाही, तर या निदर्शनात सहभाग घेतलेल्या एका तरुणानं तर अधिवेशनात मराठी बोलणाऱ्यांबाबत तीव्र संताप व्यक्त केला. या तरुणानं म्हटलंय की,

विधानसभेमध्ये अधिवेशनात मराठीत भाषणं झालेली आहेत. ते आम्हाला खटकतं. गोवा अधिवेशनात मराठीचा वावर कशाला हवा? गोव्याचं महाराष्ट्रात विलिनीकरण झालं असतं, तर गोव्यात आज ४० मतदारसंघ नसते. फक्त दोन ते चार मतदारसंघच असते. या चोरांना आमदार होण्याचीसुद्धा संधी मिळाली नसती. राजकारणात जाण्याबद्दल तर सोडूनच द्या. गोव्यातील आमदारांनी अधिवेशनात बोलतानाही कोकणीतच बोलायला हवं. अधिवेशनात मराठीमध्ये भाषण करणाऱ्यांचं तोंड बंद करण्याची हिंमत ठेवा. भाषणं ठोकून गोंयकारपण नको. राजकीय बॅनर, पोस्टर, पोस्ट सगळं कोकणीत करता आणि मराठीत बोलता, यावर आमचा आक्षेप आहे. अधिवेशनात जर कुणी मराठीत भाषण केलं, बोललं तर तिथेही आम्ही निदर्शनं करायला मागे पुढे पाहणार नाही.

दरम्यान, कोकणी भाषेवर टीका केली जात असल्याचा आरोप यावेळी इतरही निदर्शकांनी केला आहे. भाषावाद करणाऱ्यांचा निषेध यावेळी करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येनं तरुण-तरुणी जमलेले होते.

हेही वाचा – नातं गोव्याचं, देणं मराठीचं | चला संवाद साजरा करु!

भाषाद्वेष करणाऱ्यांचा निषेध

‘अक्कल नसलेले गाढव कोकणी भाषेवर चिखलफेक करत आहेत. या अशा भाषाद्वेषी प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो. गोवा मराठी भवनाच्या गेटसमोर आम्ही या गाढवाला दाखवत भाषाद्वेष करणाऱ्यांचा निषेध करतो’, अशी टीका यावेळी करण्यात आली.

जय कोकणीचा नारा देत यावेळी मराठी भवनाच्या गेटवर पोस्टरबाजी करण्यात आली. श्वास कोकणी, ध्यास कोकणी असे नारेही यावेळी लावण्यात आले.

‘आमच्या भाषेचा द्वेष करणाऱ्यांनी आम्हाला दुखावलंय. जर संविधान कोकणीला मान्यता देतं, तर इतरांच्या पोटात कोकणीमुळे का दुखतं’, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.

हेही वाचा – शेवटी ‘मरे’ तरी ‘शाश्वत जिवंत’ कोकणी…

‘आम्ही दुखावलोय’

‘महाराष्ट्रवादी संपले असले तरी मराठीवादी अजूनही आम्हाला दुखावत आहे. आमचा मराठीबाबत द्वेष नाही, मात्र मराठीवादी असलेल्यांनी कोकणीचा द्वेष करु नये’, असं या निदर्शनात सहभागी झालेल्या तरुणीनं म्हटलंय. कोकणीला नावं ठेवणाऱ्यांना फक्त गोव्यातूनच नव्हे तर गोव्याबाहेर असणारेही उत्तरं देतील, असं या तरुणीनं ठणकावलंय.

भाषेसाठी लढणाऱ्यांबाबत मेळावलीवासीयांनीही अभिमान व्यक्त केला. तसंच स्वयंघोषित विद्वान जे भाषेचा वाद करु पाहत आहेत, त्यांनी वेळीच हे थांबवावं, असाही इशाराही यावेळी देण्यात आला. मराठी भवनाचं खंडर करणाऱ्यांनी हे मराठी भवन आमच्या हातात द्यावं, आम्ही ते चालवून दाखवू, असं ओपन चॅलेंजही यावेळी देण्यात आलं.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – हुश्श…! नव्या पॉलिसीबाबत WhatsAppचा मोठा दिलासा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!