पावसाचा कहर! करमाळी येथे ट्रॅकवर माती, कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत

रेल्वे ट्रॅकवर माती आणि पाणी आलं

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : मुसळधार पावासाच फटका कोकण रेल्वे वाहतुकीला बसला आहे. ओल्ड गोवा बोगद्यात मुसळधार पावसामुळे ट्रॅकवर माती आणि पाणी आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून अनेक गाड्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसानं संपूर्ण राज्याला झोडपून काढलंय.

लांब पल्ल्याच्या गाड्यांना फटका

कोकण रेल्वे मार्गावर गोवा राज्यातील करमाळी आणि थिव्हिम स्टेशन दरम्यान असलेल्या जुना गोवा बोगद्यात सतत मुसळधार पावसामुळे सोमवारी ट्रॅकवर माती आणि पाणी आलं. पाणी आणि चिखल ट्रँकवर भरल्याने या मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली होती. दरम्यान, आता रेल्वे प्रशासनाकडून गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे.

बचावकार्य सुरु

थिवी आणि करमाळी या स्थानकांदरम्यान असलेल्या ओल्ड बोगद्यातील ट्रॅकवरील माती हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कालावधीत सर्व गाड्या नजीकच्या स्थानकांमध्ये थांबवून ठेवण्यात आल्या आहेत. काही तासातच वाहतूक पुन्हा सुरळीत केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. पहाटे ४ वाजल्यापासून कोकण रेल्वे मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!