किरणपाणी, न्हयबाग चेक नाके 23 मे पर्यंत सील !

गोव्यात येण्यासाठी आता फक्त पत्रादेवी नाक्याचा मार्ग

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणे : किरणपाणी-आरोंदा व न्हयबाग-सातार्डा हे दोन्ही नाके पूर्णपणे सील करण्यात आले आहेत. कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट किंवा ई पास असला तरीही प्रवेश दिला जाणार नाही. आजपासून याची अंमलबजावणी सुरू झाली असून दोन्ही नाक्यावर पोलीस तैनात करण्यात आलेत. दोन्ही नाक्याला पोलीस अधीक्षक, पेडणे पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांनी भेट दिली. पेडणे उपजिल्हाधिकारी रविशेखर निपाणीकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, दोन्ही नाके बंद करण्यात आले आहेत. केवळ पत्रादेवी मुख्य नाका खुला असेल. त्याच नाक्यावरून वाहतूक ये जा केली जाईल. किरणपाणी – आरोंदा आणि सातार्डा न्हयबाग हे दोन्ही नाके सर्व प्रकारच्या वाहनासाठी, नागरिकांना ये जा करण्यासाठी पुढील आदेश येईपर्यंत बंद केले आहे. केवळ राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील पत्रादेवी हाच चेक नाका सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी, नागरिकाना प्रवेश देण्यासाठी खुला असणार आहे. याच नाक्यावर राज्यातून बाहेर जाताना ई पास तर बाहेरून राज्यात येणाऱ्या प्रवाशांना कोरोना नकारात्मक दाखला घेवून यावा लागेल. तरच प्रवेश दिला जाईल. यामुळं वाहतूकदार व कामगार जे राज्यात आरोंदा शिरोडा, सातार्डा, सातोसे इथून येतात त्यांना थेट पत्रादेवी नाक्यावर येवूनच त्या त्या भागात नियोजित स्थळी जावे लागणार आहे. यासाठी त्यांना जास्तीचा प्रवास करावा लागणार आहे. केरी, पालये, किरणपाणी, हरमल, तेरेखोल या भागातील नागरिक आरोंदा, शिरोडा या भागात व्यवसायाच्या निमित्ताने, अत्यावश्यक सेवेसाठी कायदेशीर परवानगी घेवून जात-येत होते, त्यांना आता किमान २० पेक्षा जास्त किलोमीटर प्रवेश करून पत्रादेवी नाका गाठावा लागणार आहे. त्यामुळे या लोकांची धांदल उडणार आहे. २३ मे पर्यंत हे नाके सर्वप्रकारच्या वाहतूक व नागरिकाना बंद असतील .

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!