परवानग्या कालबह्य! 5 हजार कोटींचा प्रकल्प मोडीत!

तेरेखोल नदी बचाव समितीच्या न्यायालयीन लढ्यास यश. जेटीसाठी नव्याने करावी लागणार प्रक्रिया.

Goan Varta Live | प्रतिनिधी

मोरजी : किरणपाणी जेटीचा पाच हजार कोटींचा प्रकल्प हरिद लवादाच्या निर्णयामुळे स्थगित झाला आहे. या विरुद्ध राष्ट्रीय हरित लवादाच्या पुणे विभागात लढा देणाऱ्या ‘तेरेखोल नदी बचाव समिती आणि आरोंदा बचाव संघर्ष समिती’ने समाधान व्यक्त केले आहे. हा प्रकल्प पुन्हा कार्यान्वित होऊ नये, यासाठी संयुक्त लढा देण्याचा निर्धार केला आहे.

रविवारी केरी–तेरेखोल फेरी धक्याजवळ झालेल्या बैठकीत या लढ्याचा आढावा घेण्यात आला. केरी तेरेखोल पंचायतीचे माजी सरपंच स्व. डायगो फ्रान्सिस फर्नांडिस यांच्या नावावर ही याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे सुपुत्र रॉड्रिग्ज यांच्या नावावर चालू राहिली. जनशक्ती–आरोंदा आणि महाराष्ट्राचे विधानपरिषदेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनीही किरणपाणी पोर्ट प्रा. लिमिटेड या कंपनीविरुद्ध 2015 साली राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती. ऍड. प्रणय कामत, ऍड. प्रसाद शहापूरकर व ऍड. श्वेता बोरकर यांनी तेरेखोल नदी बचाव समितीची बाजू मांडली होती.

तेरेखोल नदी बचाव समितीचे अध्यक्ष सचिन परब (Sachin Parab) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला आरोंदा बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष मनोहर आरोंदेकर, विद्याधर नाईक, तेरेखोल नदी बचाव समितीचे सल्लागार ऍड. प्रसाद शहापूरकर, नारायण सोपटे–केरकर, शंभू परब, दयानंद मांद्रेकर, तातोबा तळकर आदी उपस्थित होते.

संबंधित कंपनीने यापूर्वी ही जेटी सुरु करण्यास गोवा आणि महाराष्ट्र सरकारकडून घेतलेले सर्व दाखले कालबाह्य झाल्याने कंपनीला नव्याने दाखले घ्यावे लागतील, असे ऍड. शहापूरकर यांनी सांगितले. त्यामुळे किरणपाणी जेटीचे अस्तित्व संपुष्टात आल्यात जमा आहे. मात्र किरणपाणी पोर्टने करोडो रुपयांची गुंतवणूक केली असल्याने ही गुंतवणूक वाया जाउ नये, यासाठी कंपनी नव्याने प्रयत्न करू शकेल. त्यासाठी लढा चालू ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

येत्या रविवारी 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता आरोंदा येथे बैठक घेण्याचे ठरविण्यात आले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!