किरणपाणी-आरोंदा नाका दोन्ही राज्यातील नागरिकांसाठी खुला

मांद्रेचे आमदार दयानंद सोपटेंची माहिती; सोपटेंनी चेक नाक्यावर धडक दिल्यानंतर घेतला निर्णय

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणे: किरणपाणी आरोंदा चेक नाक्यावर आता यापुढे महाराष्ट्रातून गोव्यात किंवा गोव्यातून महाराष्ट्रात ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडवणार नाही. मांद्रेचे आमदार दयानंद सोपटेंनी आरोंदा किरणपाणी चेक नाक्यावर कार्यकर्त्यांसहित मंगळवारी धडक दिली. सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे आमदार सोपटेंनी चर्चा केल्यानंतर हा चेकनाका सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे.

हेही वाचाः लखनऊमध्ये भररस्त्यात तरुणीची कॅब चालकाला मारहाण

१४ मे पासून केले होते सील

किरणपाणी – आरोंदा आणि न्हंयबाग – सातार्डा हे दोन्ही चेक नाके पूर्णपणे १४ मे पासून सील केले होते.  त्यामुळे गोव्यातून महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्रातून गोव्यात यायचं जायचं असेल, तर कोविड निगेटिव्ह सर्टिफिकेट किंवा ई-पास शिवाय प्रवेश दिला जात नव्हता. हा प्रकार १४ मे पासून सुरु केला होता. दोन्ही चेक नाक्यावर पोलीस तैनात करण्यात आले होते. केवळ पत्रादेवी मुख्य नाका खुला होता. त्याच नाक्यावरून वाहतूक सुरू होती. मात्र कोविड निगेटिव्ह सर्टिफिकेट आणि ई-पास हे दोन्ही असूनही किरणपाणी आणि न्हंयबाग या नाक्यावरून  कुणालाच यायला-जायला दिलं जात नव्हतं. या घटनेमुळे प्रवासी त्रस्त झाले होते. आरोंदा, शिरोडा, सातार्डा, सातोसे या भागातील नागरिकांना थेट पत्रादेवी नाक्यावर येऊनच नियोजित स्थळी जावं लागत होतं. त्यामुळे त्या लोकांना कामानिमितानं ये-जा करण्यासाठी मोठाच प्रवास करावा लागत होता.

हेही वाचाः मांद्रे कॉलेज ऑफ कॉमर्सचे ५ ऑगस्ट रोजी उद्घाटन

गोंयकारांना महाराष्ट्रात नाकारत होते प्रवेश

हल्ली कामानिमित्ताने सिंधुदुर्ग भागातील नागरिकांना आरोंदा-किरणपाणी भागातून प्रवेश देण्याचा प्रकार वाढला होता. मात्र गोव्यातून आरोंदा परिसरात जाणाऱ्यांना प्रवेश दिला जात नव्हता. आम्हाला जर प्रवेश दिला जात नाही, तर मग सिंधुदुर्गातील नागरिकांना गोव्यात प्रवेश का म्हणून द्यायचा? असा सवाल उपस्थित करून आमदार दयानंद सोपटेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांसहित या नाक्यावर मंगळवारी धडक दिली.

हेही वाचाः ‘हॉस्पिटालिटी, रिटेल अँड इवेंट्स क्षेत्रात गोंयकार तरुणांसाठी करिअर संधी’वर वेबिनारचं आयोजन

आमदार सोपटेंनी दिली भेट

आमदार दयानंद सोपटेंनी सिंधुदुर्ग पोलीस, तहसीलदार राजाराम म्हात्रे आणि सरपंच सुप्रिया पार्सेकर यांच्याकडे चर्चा करून हे चेकनाके दोन्ही राज्यातील नागरिकांसाठी खुले करण्याविषयी निर्णय घेतला. न्यायालयाच्या आदेशानुसार ज्यांनी कोरोनाचे दोन डोस घेतले, त्यांना विना अट प्रवेश देण्याची सुचना असतानाही नाक्यावर नागरिकांची अडवणूक होत होती. आमदार सोपटेंनी केलेल्या चर्चेनंतर या पुढे दोन्ही राज्यात येण्या-जाण्यासाठी कुणालाही अडवलं जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचाः बाल शौर्य पुरस्कारासाठी २७ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन

या नाक्यावर कुणालाच अडवणार नाही

या पुढे या नाक्यावर कुणालाच अडवलं जाणार नाही. दोन्ही राज्य एकमेकांवर अवलंबून आहेत. मागच्या दोन दिवसांपूर्वी नवीन आरोग्य कर्मचारी या ठिकाणी चेक करण्यासाठी आले होते, त्यांना वरचे नियम माहीत नव्हते. त्यांना आम्ही समजावून सांगितलं आहे. त्यामुळे या पुढे कुणालाच अडवलं जाणार नाही, असे आरोंदा सरपंच सुप्रिया पार्सेकर यांनी बोलताना सांगितलं.

हा व्हिडिओ पहाः Video | FREE INTERNET | मगो नेते प्रवीण आर्लेकर यांची मुर्डी देवसू इथंही मोफत वाय फाय सेवा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!