किरण कांदोळकरांचं दसर्‍याच्या मुहुर्तावर सिमोल्लंघन?

भाजपला रामराम, गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : थिवीचे माजी आमदार किरण कांदोळकर (Kiran Kandolkar) यांनी अखेर भाजपला रामराम करत पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. त्यांच्यासोबत सरपंच आणि पंचांनीही राजीनामा देत भाजपला सोडचिठ्ठी दिली. कांदोळकर गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असून दसर्‍याच्या मुहुर्तावर रविवारी ते पक्षप्रवेश करतील, अशी शक्यता आहे.

गेल्या काही महिन्यांपासून कांदोळकर पक्षाच्या कार्यशेलीबाबत प्रचंड अस्वस्थ होते. आणि आपली खदखद उघडपणे व्यक्त करत होते. काँग्रेसमधून आयात केलेल्या आमदारांबाबत त्यांना आक्षेप होता आणि हाच आक्षेप त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कळविला होता. मात्र त्याची दखल घेतली न गेल्यानं कांदोळकर अस्वस्थ होते. काही दिवसांपासून कठोर शब्दांत ते भाजप नेतृत्वावर टीका करताना दिसत होते. कांदोळकरांच्या बदललेल्या सुरावरून ते भाजपला सोडचिठ्ठी देतील, अशी शक्यता होती. कांदोळकर यांच्यासह त्यांचे थिवी मतदारसंघातले समर्थकही अस्वस्थ होते. त्यामुळे कांदोळकरांसह त्यांच्या समर्थक सरपंच, पंचांनीही भाजपला रामराम केला.

विजय सरदेसाईंमध्ये दिसताहेत पर्रीकर?

किरण कांदोळकर यांच्यापूर्वी मांद्रे मतदारसंघातील भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते दीपक कळंगुटकर यांनीही भाजपला रामराम केला. या दोन्ही नेत्यांचा सूर गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांच्या नेतृत्वगुणांनी प्रभावित झाल्याचा दिसत असल्यामुळे ते गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. ज्या मनोहर पर्रीकरांच्या नेतृत्वाने प्रभावित होउन या दोन्ही नेत्यांनी भाजपचं कार्य केलं, त्या मनोहर पर्रीकरांची छबी या दोन्ही नेत्यांना विजय सरदेसाईंमध्ये दिसतेय का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसतेय.

या विषयावरचं फेसबुक लाईव्ह पहा…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!