दुर्दैवी! वेर्ला येथे तळीत बुडून चिमुकल्यांचा अंत

नायकावाडा वेर्ला येथे श्री राष्ट्रोळी नारायण देवस्थानच्या तळीत बुडून मुलांचा मृत्यू

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसाः नायकावाडा वेर्ला येथे श्री राष्ट्रोळी नारायण देवस्थानच्या तळीत चाँदनी चंद्रपालसिंग रजवत (10) व पियूष चंद्रपालसिंग रजवत (5) या मुळ मध्यप्रदेशच्या शाळेकरी सख्ख्या बहीण-भावाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे रजवत कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मयत चाँदनी ही इयत्ता पाचवीत मध्ये होती. तर मयत पियुष हा इयत्ता पहिली मध्ये शिकायचा. या घटनेमुळे वेर्ला-काणका परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी 7.20 च्या सुमारास उघडकीस आली.

ट्युशनला गेलेली मुलं घरी परतलीच नाहीत

मिळालेल्या माहितीनुसार मयत चाँदनी व पियुष हे दोघे बहीण-भाऊ दुपारी 2.30 वा. ट्यूशनसाठी घरातून निघाले होते. सायंकाळी 5.30 पर्यंत दोन्ही मुलं घरी परतली नाही. त्यामुळे त्यांची आई ट्यूशन वर्गाकडे गेली. पण आज दोघंही वर्गाला आलेच नाहीत, असं ट्यूशन शिक्षकाने सांगितले. सर्वत्र शोधून मुलं सापडली नसल्याने त्यांची आई घरी परतली. सायंकाळी उशिरा सदर तळीपाशी काही लहान मुलं खेळत होती. तळीच्या किनारी मुलांचं चप्पल व शाळेचं दफ्तर असल्याचं आजुबाजुच्या लोकांना सांगितला.

♦️ हेही वाचाः ओढणीच्या झोपाळ्याने केला घात!

मुलांची शोधाशोध

सगळा प्रकार संशयास्पद असल्याने लोकांनी म्हापसा पोलिसांना माहिती देताच ते घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नंतर अग्नीशमन दलाला पाचारण केलं. अग्नीशमन दलाच्या जवानांनी तळीत मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तळ्याच्या काठा जवळच मुलीचा मृतदेह आढळला. नंतर काही अंतरावर आतमध्ये मुलाचा मृतदेह सापडला. अग्नीशमन दलाचे जवान विष्णू गावस यांनी या मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. पंचनाम्यानंतर दोघांचे मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी जिल्हा इस्पितळात पाठवून दिले. पोलीस उपनिरीक्षक विराज कोरगावकर पुढील तपास करीत आहेत.

♦️ हेही वाचाः धारबांदोड्यात कार झाडावर आदळली, दोघांवर काळाचा घाला

४ वर्षांपासून रजवत कुटुंब गोव्यात

मयत चाँदनी व मयत पियुषचे आई-वडील मूळ मध्यप्रदेशचे असून मागील चार वर्षांपासून ते गोव्यात सातेरीनगर वेर्ला येथे वास्तव्यास आहेत. मयतांचे वडील एका खासगी कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून कामाला आहेत. तर आई गृहीणी आहे.

मयत दोघेही ट्यूशनला न जाता या तळ्यापाशी आले असावेत. या तळ्यात कमळाची फुले फुलतात. दोघेजण ही फुलं काढायला पाण्यात उतरले व एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात दोघं बुडाले असावेत, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

गोवन वार्ता लाईव्हच्या YouTube चॅनेला Subscribe करा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!