एक कोटीच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण

पाच संशयितांना अटक : कामकाजात हलगर्जी, पोलीस हवालदार निलंबित

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसा/पणजी: माडेल थिवी येथून एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी नवीन पटेल (३३, रा. कुचेली म्हापसा) या प्लायवूड व्यावसायिकाचे पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणात पोलिसांनी पाचही अपहरणकर्त्यांना गजाआड करून पटेल यांची सुटका केली आणि अपहरण नाट्यावर पडदा पाडला. अपहरणासाठी वापरलेल्या मोबाईल चोरीमध्ये हलगर्जीपणा दाखवल्याबद्दल हवालदार संतोष जाधव यांना निलंबित करण्यात आलं आहे.

हेही वाचाः ‘मांद्रे कॉलेज ऑफ कॉमर्स’ला एकाच टप्प्यात अनुदान देणार

5 संशयितांना अटक

अपहरण, खंडणी व पूर्वनियोजित कटाच्या आरोपाखाली पोलिसांनी बिरेंदर कुमार उर्फ बिजू (२६, रा. बिहार), निशांत मोगन (२२, रा. मंगळूर-कर्नाटक व सध्या काबेसावाडा-सांताक्रुझ), मंजुनाथ सिद्दाप्पा बैगनूर (२८, रा. कांदोळी व शिरसी-कर्नाटक), सुजित भवन केसरकर (२५, रा. सांताक्रुझ, मूळ रा. कोल्हापूर) आणि सुभाष यशवंत भोसले (५१, रा. सांताक्रुझ, मूळ कोल्हापूर) यांना अटक करण्यात आली आहे. अपहरणासाठी वापरलेली कार आणि सुरा जप्त केला आहे. पाचही संशयित गोमेकॉत जेवण पुरवणार्‍या कंपनीत काम करत होते.

हेही वाचाः मूर्तीमंत चैतन्य… ज्ञानाचा खजिना ‘भाई खलप’

बुधवारी केलं होतं अपहरण

अपहरणाची घटना बुधवारी दुपारी १२ वा. घडली होती. रात्री ९.३० वा. एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्यानंतर अपहरण झाल्याचं उघडकीस आलं होतं. प्राप्त माहितीनुसार, अपहरण झालेले नवीन दिलीप पटेल आणि त्यांचा चुलत भाऊ फिर्यादी सुनील तुळशीदास पटेल यांचा प्लायवूडचा व्यवसाय आहे. नवीन यांचा माडेल थिवी येथे, तर सुनील यांचे पर्वरीत दुकान आहे. बुधवारी दुपारी १२ वा. नवीन आपल्या व्यवसायस्थळी होते. तिथे चार अपहरणकर्ते क्रेटा कारने आले. त्यांनी नवीन यांना पिस्तुलाचा धाक दाखवून गाडीत बसवलं. त्यांना आगशी येथील एका बांधकाम अपूर्ण स्थितीत असलेल्या घरात नेऊन ठेवलं. संशयितांनी संध्याकाळी ५.३० च्या सुमारास जुने गोवा येथे दोघा कामगारांकडील मोबाईल हिस्कावून घेतला. त्या फोनवरून पटेल यांच्या पत्नीशी संपर्क साधला आणि अपरहणाची माहिती दिली. दुपारी २.३० वा. नवीन यांच्या फोनवरून संपर्क करून दुपारी जेवायला येणार नसल्याचा मेसेज पाठवला होता. संध्याकाळी ७.३०च्या सुमारास पटेल कुटुंबियांशी संपर्क साधून संशयितांनी एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. त्याकडे पटेल कुटुंबियांनी दुर्लक्ष केले. संशयितांनी रात्री ९.३० वा. पुन्हा संपर्क साधून खंडणीची रक्कम न दिल्यास नवीनला ठार मारण्याची धमकी दिली.

हेही वाचाः फोडाफोडीला सुरुवात! भाजपच्या माजी मंत्र्यांचा आपमध्ये प्रवेश

24 तासांच्या आत पोलिसांनी लावला प्रकरणाचा छडा

या प्रकाराने भांबावलेल्या पटेल कुटुंबियांनी कोलवाळ पोलीस स्थानकात धाव घेऊन अपहरणाची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने तपास करून मध्यरात्री १ च्या सुमारास सांताक्रुझ येथे संशयित बिरेंदर कुमार आणि निशांत मोगन यांच्या खोलीवर छापा मारून त्यांना ताब्यात घेतलं. चौकशीअंती त्यांनी नवीन यांना आगशी येथे ठेवल्याची माहिती दिली. गुरुवारी सकाळी ९.३०च्या सुमारास पोलिसांनी सदर घरावर छापा मारला. त्या ठिकाणी संशयित मंजुनाथ बैगनूर, सुजित केसरकर व सुभाष भोसले होते. त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी नवीन पटेल यांची सुखरूप सुटका केली.

हेही वाचाः सासष्टी तालुक्यात सर्वाधिक ५१२ मुंडकार खटले प्रलंबित

या अहपरण प्रकरणाचा पोलिसांनी काही तासांत छडा लावला. पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली कोलवाळ, तसंच बार्देश व तिसवाडीतील पोलिसांनी ही कारवाई करून संशयितांना अटक केली. पुढील तपास कोलवाळ पोलीस करत आहेत. आगशीतून घेतली भाड्याने कार अपहणाच्या आधी दोन दिवस संशयितांनी माडेल परिसरात रैकी पटेल यांच्या व्यवसायाची पाहणी केली होती. संशयितांनी अपहरणासाठी आगशी येथीलच क्रेटा कार भाड्याने घेतली होती.रस्त्यावरून न दिसणाऱ्या घराची निवड संशयित निशांत मोगन याला माडेल परिसरातील लोक ओळखत होते. त्यामुळे अपहरणाच्या दिवशी आपल्या खोलीवरच राहिला होता. अपहरणानंतर पटेल यांना ठेवलेले घर अर्धवट बांधकाम स्थितीत आहे. सदर घराचा मालक सात वर्षांपूर्वीच बांधकाम अर्धवट ठेवून परदेशात गेला आहे. ते घर मुख्य रस्त्यावरून दिसत नाही. त्या घरासमोर दोन घरे असून तीही बंद आहेत. त्यामुळे हेच घर संशयितांनी वापरण्याचं ठरवलं.

हेही वाचाः आसगाव, हणजूण येथे ड्रग्ज जप्त

अपहरणाचा कट रचला कारागृहात

संशयित निशांत मोगन आणि बिरंदर कुमार यांना नोव्हेंबर २०२०मध्ये दुचाकी चोरी प्रकरणी अटक केली होती. त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. तेथे त्यांना सुजित केसरकर भेेटला. निशांत मोगन हा पूर्वी पटेल बंधूंकडे कामाला होता. लॉकडाऊन काळात तो काम सोडून गेला होता. दोन्ही पटेल बंधूंकडे त्याने काम केले होते. कारागृहात त्यांनी मोठ्या चोरीचा बेत आखला. निशांत मोगनने नवीन पटेलचं अपहरण केल्यास भरपूर पैसा मिळू शकतो, असं सांगितलं. कारागृहातच हा अपहरणाचा कट रचण्यात आला. या कटात नंतर मंजुनाथ आणि सुभाष सामील झाले.

हेही वाचाः पुरामुळे धारबांदोड्यात दोन कोटींचं नुकसान

गुन्हा न नोंदवणाऱ्या हवालदाराचे निलंबन

संशयितांनी संध्याकाळी ५ च्या सुमारास जुने गोवे येथे दोघा उत्तर प्रदेशमधील कामगारांना जबरदस्तीने कारमध्ये कोंबलं. मारहाण करून त्यांचे मोबाईल काढून घेतले. त्यांना काही अंतरावर नेऊन सोडलं. त्या कामगारांनी याबाबत जुने गोवे पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलीस हवालदार संतोष जाधव यांनी हा अपहरण आणि चोरीचा प्रकार असताना गुन्हा न नोंदवता फक्त मोबाईल मिसिंगचा (गहाळ झाल्याचा) रिपोर्ट घेतला. हाच चोरलेला मोबाईल संशयितांनी खंडणी मागण्यासाठी वापरला. सेवेत हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून हवालदार जाधव यांना खात्याने निलंबित केलं आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | ACCIDENT | डंपर अंगावर येताच तरुणाची दुचाकीवरून उडी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!