करुळ, भुईबावडा घाटात दरड कोसळली ; वाहतूक विस्कळीत

एनडीआरएफच्या टीमनं काही तासात वाहतूक केली सुरळीत

Goan Varta Live | प्रतिनिधी

वैभववाडी : गोवा आणि कोकणाला घाटमाथ्याशी जोडणारे करुळ आणि भुईबावडा हे दोन महत्वाचे घाट. जोरदार पावसाचा तडाखा या दोन्ही घाटांना बसला. या दोन्ही घाटात दरडी कोसळल्यामुळं वाहतूक विस्कळीत झाली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारी सायंकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. वैभववाडीतही पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे दोन्ही घाटात दरडी कोसळल्या होत्या. करुळ घाटात सकाळी दरड कोसळली होती. त्यानंतर दुपारी भुईबावडा घाटही दरड पडल्यामुळे बंद झाला होता. तहसीलदार रामदास झळके यांनी एनडीआरएफची टीम व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिका-यांसह घटनास्थळी जाऊन दुपारी करुळ घाट वाहतुकीस खुला केला.

दुपारी कोसळलेल्या भुईबावडा घाटातील दरड जेसीबीच्या साह्याने हटवून सायंकाळी त्याही घाटातील वाहतूक सुरू केली. एकाचवेळी दोन्ही घाटात दरडी कोसळल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र प्रशासकीय यंत्रणेने युद्धपातळीवर काम करून हे मार्ग खुले करून दिले. तालुका प्रशासनाच्या मदतीला एनडीआरएफची टीम आल्याने काम आणखी सोपे झाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!