कला अकादमी : तांत्रिक समितीद्वारे चौकशी करा…

दक्षता खात्याची राज्य सरकारला शिफारस; भ्रष्टाचार झाल्याचा संशय

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : तब्बल ४९ कोटी खर्चून सुरू असलेल्या कला अकादमीच्या नूतनीकरण कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीत प्राथमिक तपासात तथ्य आढळून आले आहे. यामुळे त्रिसदस्यीय तंत्रज्ञांची समिती स्थापन करून त्याद्वारे भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी शिफारस दक्षता खात्याने राज्य सरकारकडे केली आहे. या समितीत पीडब्ल्यूडीतील (सार्वजनिक बांधकाम खाते) कोणीही असता कामा नये, असेही खात्याने स्पष्ट केले आहे.
हेही वाचाःमुले पळविल्याच्या अफवांवरुन संशयिताला मारहाण…

मंत्रिमंडळाची दिशाभूल केली असण्याची शक्यता

पीडब्ल्यूडी आणि कला व संस्कृती खात्याने मंत्रिमंडळाची दिशाभूल केली असण्याची शक्यता आहे. म्हणूनच नूतनीकरणाचा खर्च ४९ कोटींवर गेला असावा, असे निरीक्षण दक्षता खात्याने नोंदवले आहे. यामुळेच या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी त्रयस्थ अशा तांत्रिक जाणकारांची त्रिसदस्यीय समिती नेमण्याची शिफारस खात्याने केली आहे. यामध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रोफेसर के. जी. गुप्ता व संदीप प्रभू चोडणेकर यांच्या नावांचीही शिफारस त्यांनी केली आहे.
हेही वाचाःउत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये ‘पिट बूल’ आणि ‘रॉटवायलर’ या श्वान प्रजातींवर बंदी, ‘कारण’…

हे काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणे अशक्य

कला अकादमीचे नूतनीकरण आणि निविदा हे विषय वादग्रस्त ठरले आहेत. निविदा जारी करताना सीबीडब्ल्यूडीच्या नियमांचे पालन होऊ शकले नाही, असा आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात केला होता. निविदेच्या रकमेवरही त्यांनी आक्षेप घेतला होता. दरम्यान, कला अकादमीच्या नूतनीकरणाचे काम सुरू होऊन वर्ष उलटले आहे. हे काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणे अशक्य आहे. नूतनीकरणाच्या निविदेत कसलाच भ्रष्टाचार झालेला नाही. नूतनीकरणाचे काम पारदर्शकपणे सुरू आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच कला मंत्री गोविंद गावडे यांनी विधानसभेत स्पष्ट केले होते.
हेही वाचाःमुले पळविल्याच्या अफवांवरुन संशयिताला मारहाण…

खर्चाची तांत्रिक समितीमार्फत चौकशी होणे गरजेचे

दरम्यान, आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर आणि अविनाश तावारिस यांनी भ्रष्टाचारविरोधी पथकाकडे रीतसर तक्रार दिली होती. नियमानुसार निविदा जारी न करताच ठरावीक कंपनीला नूतनीकरणाचे काम देण्यात आले आहे. यामध्ये गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप त्यांनी तक्रारीत केला होता. पण तक्रारीसह पूरक अशी कागदपत्रे नसल्याचे कारण देत भ्रष्टाचारविरोधी पथकाने ‘भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८’ खाली चौकशी करणे शक्य नाही, असे सांगत त्यांनी तपास बंद केला होता. दक्षता खात्याने मात्र तक्रारीत प्राथमिक तपासात तथ्य आढळल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. निविदा जारी करण्याची पद्धत तसेच खर्चाची तांत्रिक समितीमार्फत चौकशी होणे गरजेचे आहे. तांत्रिक समितीने अहवाल दिल्यानंतर भ्रष्टाचाराची चौकशी करणे शक्य होईल, असे दक्षता खात्याने म्हटले आहे.
हेही वाचाःचोरट्यांनी बंद घर फोडून १४.८५ लाखांचे दागिने केले लंपास…

गुन्हा नोंदवण्यात झाली चालढकल

– सुदीप ताम्हणकर यांनी ८ ऑगस्ट २०२२ रोजी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षकांकडे तक्रार दिली होती. गुन्हा नोंद झाला नाही म्हणून त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली होती.
– तक्रारीत कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे, पीडब्ल्यूडीच्या विभाग ५ चे कार्यकारी अभियंते व अन्य संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात फौजदारी दंड संहितेच्या कलम १५४(१) खाली गुन्हा नोंद करण्याची मागणी केली होती.
– कला अकादमीच्या नूतनीकरण कामाच्या निविदेत पक्षपात झाला. मर्जीतील कंत्राटदाराला हे काम देण्यात आले आहे, असे त्यांनी त्या तक्रारीत म्हटले होते.
हेही वाचाःराज्यातील आठ गायींना लंपी रोगाची झाली लागण…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!