जी.डी.एक्स 01, कदंबा कर्मचाऱ्यांची लक्ष्मी

दरवर्षीप्रमाणे रविवारी दसऱ्याला मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंतानी जी.डी.एक्स 01 बसचे पुजन केलं.

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजी: कदंबाचे सर्व कामगार जी.डी.एक्स 01 बसला लक्ष्मी मानतात. प्रत्येकाला या बस विषयी आदर आणि आपुलकी आहे. सरकार जेव्हा ट्रान्सपोर्ट भवन बांधेल त्यावेळी तिथे खास व्यवस्थाकरुन ही बस ठेवण्यात यावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केल्याचे सरव्यवस्थापक संजय घाटेंनी सांगितलं.

गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंह राणेंनी 1980 साली कदंबा महामंडळाची स्थापना केली. गोव्यातील खेडोपाड्यातील लोकांना ये-जा करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध व्हावी या उद्देशाने कदंबाची स्थापना करण्यात आली. सुरुवातीला एका बसने हे महामंडळ सुरू झालं. ती बस आणि तिचा पहिला रुट होता जी.डी.एक्स 01, धावे सत्तरी ते आगशी फेरी.

टाटाच्या 692 मॉडलची आणि 6 सिलींडर इंजिनची ही बस आहे. सुरुवातीला या बसला 12 वोल्ट इलेक्ट्रिक कनेक्शन होतं जे कालांतराने 24 वोल्ट करण्यात आलं. इंजिनचं फक्त 3 वेळाच रिपेरींग केलं आहे. 50 सीटरच्या या बसचे सीट कव्हर अजूनही जसेच्या तसे आहेत. त्यावेळी रुबी कंपनीने ही बस तयार केली होती आणि तिची किंमत होती 2 लाख 10 हजार. आज अशीच बस बांधली तर तिची किंमत ही 33 ते 36 लाख एवढी होत असल्याचं सरव्यवस्थापक संजय घाटेंनी सांगितलं.

पहिली कदंबा आणि तिचा प्रवास

19 ऑक्टोबर 1980 रोजी ही पहिली कदंबा बस लोकांच्या सेवेत सुपूर्द केली. कदंबा जी.डी.एक्स 01चा रुट धावे सत्तरी ते आगशी फेरी असा होता. ही बस महामंडळाच्या ताफ्यात आल्यावर दिवसाला 110 ते 120 किलोमीटर चालायची. त्यानंतर 1983मध्ये ही बस 200 ते 250 किलोमीटर चालली. 25 वर्षांपर्यत या बसने लोकांची सेवा केलीय. या 25 वर्षात या बसने साडेतेरा लाख किलोमीटरांचा प्रवास केलाय. कायद्याप्रमाणे कोणतीही बस 25 वर्षांनंतर रस्त्यावर चालवता येत नाही. अन्यथा ही बस अद्याप तंदुरुस्त असल्याचे कंदंबाचे सरव्यवस्थापक संजय घाटेंनी गोवन वार्ता लाईव्हशी केलेल्या खास संवादात सांगितलं.

पहा व्हिडीयो

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!