पत्रकार लक्ष्मण ओटवणेकर यांचं निधन

Goan Varta Live | प्रतिनिधी
पेडणेः हरमल येथील पत्रकार लक्ष्मण दाजी ओटवणेकर (वय वर्षं, 53) यांचं हृदयविकाराच्या झटक्याने रविवारी 1 ऑगस्ट रोजी पहाटे निधन झालं. रविवारी दुपारी 12 वाजता खालचावाडा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी-लक्षिता (विषया), पुत्र सोहम, कन्या-लक्षाली, भाऊ, काका-काकी, चुलत बंधू, भावजया, पुतणे-पुतणी असा परिवार आहे.
हेही वाचाः साळ येथे प्रशासन शेतकऱ्यांच्या दारी; कृषीमंत्र्यांनी दिली साळ गावाला भेट
अष्टपैलू व्यक्तीमत्व
ते उत्तम नाट्यकलाकार म्हणून परिचित होते. पेडणे तालुक्यात त्यांनी अनेक गावात हौशी रंगभूमीवर भूमिका करून चमक दाखविली होती. हरमल नवरात्रोत्सव मंडळ, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, दूर्वांकूर कला केंद्र, मराठी संस्कार केंद्र, श्री नारायणदेव हौशी नाट्यमंडळ तसंच गावातील आणि तालुक्यातील अनेक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. पत्रकारितेत त्यांनी असंख्य समस्या प्रकाशात आणल्या. तसंच कित्येकांना मदतीचा हातसुद्धा दिला. त्यांच्या अष्टपैलू स्वभावामुळे तालुक्यातील अनेक संस्थांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. तसंच अनेक मान-सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आलं होतं.
हेही वाचाः मुख्यमंत्र्यांच्या नावे फेक फेसबुक अकाऊंट करणाऱ्या संशयितास अटक
राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तीमत्त्वांनी घेतलं पार्थिवाचं अंत्यदर्शन
माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी केंद्रीयमंत्री ऍड. रमाकांत खलप, माजी मंत्री संगीता परब, शिवसेना राज्यप्रमुख जितेश कामत, गोवा फॉरवर्डचे दीपक कळंगुटकर, माजी जी.पं.स. अरुण बांधकर, श्रीधर मांजरेकर, उद्योजक सचिन परब, नारायण रेडकर, नामदेव तुळस्कर, मांद्रेचे पंच राघोबा गावडे, बाबूसो हडफडकर, पंच प्रवीण वायंगणकर तसंच तालुक्यातील पत्रकार, विविध पंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य तसंच सामाजिक, सांस्कृतिक संघाचे सहकारी सदस्य आणि प्रतिष्ठित नागरिकांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. त्यांच्या निधनामुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.