५० कोटी घेऊन नवीन पक्षात प्रवेश !

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : चर्चिल आलेमाव आणि आलेक्स रेजिनाल्ड यांनी नवीन पक्षात सामील होऊन त्यांच्या मतदारांचा विश्वास तोडला आहे. बाणावलीच्या आमदाराने ५० कोटी घेऊन नवीन पक्षात प्रवेश केला त्यामुळे, बाणावली आणि कुडतरीच्या या आमदारांना निरोप देण्याची वेळ आली आहे, अशी उपरोधिक टीका आम आदमी पक्षाचे (आप) नेते वेन्झी व्हिएगस यांनी केली.
राज्यात सध्या दोन प्रकारचे राजकारणी
“राजकारण कधीही घाणेरडे नव्हते, राजकारण हे कालांतराने गलिच्छ केले गेले आहे. ‘आप’ने लोककेंद्रित राजकारणाचा नवीन प्रकार आणून व्यवस्थेत क्रांती घडवून आणण्याच्या उद्देशाने राजकारणात प्रवेश केला असे प्रसारमाध्यमांना संबोधित करताना व्हिएगास म्हणाले. ते पुढे म्हणाले, राज्यात सध्या दोन प्रकारचे राजकारणी आढळतात. जे निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन नवीन पक्षात सामील होतात. दुसरा प्रकार म्हणजे निवडणुकीनंतर मत विकून नव्या पक्षांमध्ये सामील होतात.
९३७३ मतदारांचे ५३,३४४ रुपये थकित
गेल्या निवडणुकीत बाणावलीतील ९३७३ लोकांनी राष्ट्रवादीला मतदान केले. बाणावलीच्या आमदाराने ५० कोटी घेऊन नवीन पक्षात प्रवेश केला. ५० कोटींसाठी बाणावलीच्या आमदाराने आपली मते विकली. आता ते नव्या पक्षात सामील झाले आहेत. जर आपण त्यांचे ५० कोटी त्यांच्या मतदारांमध्ये विभागले तर प्रत्येक मतदाराला ५३,३४४ रुपये मिळतील. चर्चिल आलेमाव यांच्या ९३७३ मतदारांचे ५३,३४४ रुपये थकित आहेत, असे व्हिएगस म्हणाले.
परिवर्तन घडवून आणण्यासाठी ‘आप’ला मतदान करा
जनतेने परिवर्तन घडवून आणण्यासाठी ‘आप’ला मतदान करावे. राज्याला प्रामाणिक कारभार करणाऱ्या पक्षाला मतदान करा, असे आवाहन वेन्झी व्हिएगस यांनी केले.