अखेर कुडाळकर कुटुंबियांच्या मदतीला जीत आरोलकर पोचले

घरावर पडलेलं झाड बाजूला काढून कुडळकरांना दिलासा दिला

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः सरकार, आमदार, मंत्री, सरपंच किंवा पंच कुणीही मागच्या आठ दिवसापासून मदतीची याचना करणाऱ्या मधलावाडा येथील कुडाळकर कुटुंबियांच्या मदतीला धावून आले नाहीत. आठ दिवसानंतर मात्र मांद्रेचे मगोचे जीत आरोलकर यांनी क्रेन उपलब्ध करून घरावर पडलेले झाड कापून कुडाळकर कुटुंबियांना दिलासा दिला.

हेही वाचाः रावण गावात फुलले भेंडीचे मळे; दर दिवशी 700 किलो भेंडीची तोडणी

लाखो रुपयांचं नुकसान

तौक्ते चक्रीवादळामुळे 16 मे रोजी मधलावाडा मोरजी येथील ध्रुव कुडाळकर तसंच त्यांच्या शेजारच्या घरावर भलेमोठे आंब्याचे झाड पडले. यामुळे या कुटुंबाचं लाखो रुपयांचं नुकसान झालं. 16 मे रोजी पडलेले झाड आठ दिवस त्याच अवस्थेत घरावर होते. जीव मुठीत घेऊन कुडाळकर कुटुंबीय जीवन जगत होते. त्याचप्रमाणे शेजारील घरावर 5 माड, आंब्याचं झाड पडून त्यांच्या घराचं तसंच वाहनांचं नुकसान झालं. त्यातून दोन्ही कुटुंबांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं.

जीत आरोलकर धावले मदतीला

मागचे आठ दिवस दोन्ही कुटुंब मदतीची याचना करत होती. झाड घरावर पडताच कुडाळकर कुटुंबाने सरकारी यंत्रणेला कळवलं, अग्निशमन दलाला कळवलं, मोरजी पंचायतीला लेखी अर्ज दिला, शिवाय स्थानिक आमदार दयानंद सोपटेंनाही याची कल्पना दिली. मात्र आठ दिवस उलटूनही कोणीच या कुटुंबियांच्या मदतीला आलं नाही. अखेर मांद्रेचे मगोप नेते जीत आरोलकर यांना याबद्दल समजताच त्यांनी वेळ न दडवता क्रेन आणून हे झाड दूर केलं. सरकारी यंत्रणा या दोन्ही कुटुंबियांच्या मदतीला आली नसल्याने स्थानिकांनी त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचाः दहावीची परीक्षा रद्द करण्याचा सरकारचा निर्णय धक्कादायक

आमच्या संकटकाळी मंत्री, आमदार जातात कुठे?

आमदार मंत्री केवळ निवडणुकीच्या काळात मतासाठी घरोघरी येतात. मात्र चक्रीवादळ येऊन घरांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं तरी त्याची कुणी साधी चौकशीही केली नाही. निवडणुकांच्या वेळी हेच आमदार, मंत्री मात्र घरोघरी मतासाठी वारंवार येतात, तर मग आमच्या संकटकाळी हे लोक कुठे जातात, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केलाय.

सरकारने नुकसान भरपाई द्यावी

आमच्या घरावर पाच नारळाची झाडं, आंब्याचं झाड पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तसंच वाहनांचंही नुकसान झालंय. आता कोरोनामुळे टॅक्सी व्यवसायही संकटात आहे. उत्पन्नाचं साधन बंद झालंय. झाड पडून घराच्या भींतीना तडे गेलेत. त्यामुळे अधिक धोका आहे. सरकारने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी टॅक्सी मालक बेबलो सीमाईस यांनी केलीये.

हेही वाचाः मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ देण्याचे संकेत

जीत आरोलकर हे भावी लोकप्रतिनिधी

ज्या दिवशी घरावर झाड पडलं, त्या दिवशी आम्ही संबंधित खात्याला, आमदरालाही कळवलं. मात्र कुणीच मदतीला आलं नाही. मात्र सामाजिक कार्यकर्ते जीत आरोलकर हे आमच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी आमचं थोडं का होईन संकट दूर केलं. जे काम आमदार, सरकारी यंत्रणेनं करायला हवं होतं, जीत आरोलकरांनी केलं. त्यामुळे तेच आमचे भावी लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्यामागे सर्वसामान्य जानता आहे, अशी प्रतिक्रिया केदार कुडाळकर यांनी दिली.

सरकार कुणासाठी?

आठ दिवस होऊन गेले तरी सरकारी यंत्रणा किंवा आमदार आमच्या घराकडे फिरकलेही नाहीत. पेडणे अग्निशमन दल मदतीला आलं नाही. सरकार कुणासाठी आहे तेच कळत नाही, असं म्हणत ध्रुव कुडाळकर यांनी सरकारी यंत्रणेविषयी नाराजी व्यक्त केली. तसंच जीत आरोलकर मदतीला आले म्हणून त्यांचे आभार मानले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!