लोक ऐकेनात! घरगुती साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी
पणजी : राज्यात जनता कर्फ्यू लागू असला, तरी जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीला मुभा आहे. लोकांनी घरगुती साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी करू नये, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं असलं, तरी लोक ते मनावर घेताना दिसत नाहीत. लोक नियमांचं उल्लंघन करत असल्यानं राज्यात अनेक ठिकाणी पोलिसांनी हस्तक्षेप करत दुकानांची शटर्स ओढायला भाग पाडलं.
PHOTO STORY | ‘जनता कर्प्यू’मुळे समुद्रकिनारे सुने सुने…
फोंड्यात उसळली गर्दी
फोंडा बाजारात रविवारी सकाळीच घरगुती वापराच्या साहित्य खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात लोक घराबाहेर पडले. त्यामुळे अनेक दुकानांसमोर गर्दी झाली. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी बाजारात फेरफटका मारून गर्दी न करण्याचं आवाहन केलं. मात्र लोक मागे हटेनात. त्यामुळे पोलिस निरीक्षक मोहन गावडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी दुकानं बंद करण्याच्या सूचना केल्या. फोंड्यातील गोवा बागायतदारमध्येही लोकांनी खरेदीसाठी गर्दी केली. पोलिसांनी तिथेही काही काळासाठी बाजार बंद ठेवण्याची सूचना केली. ग्राहकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळल्यानंतर बाजार सुरू करण्यात आला.
VIRAL | म्हणे, नियमित गोमूत्र प्यायल्याने कोरोना जातो
सांतिनेजमध्ये वेळेचं उल्लंघन
सकाळी 7 ते दुपारी 1 या वेळेतच जीवनावश्यक वस्तूंची विक्री-खरेदी करण्यास मुभा आहे. मात्र जनता कर्फ्यूच्या पहिल्याच दिवशी अनेक दुकानदारांकडून या नियमावलीचं उल्लंघन होताना दिसून आलं. पणजीतल्या सांतिनेजमध्ये दुपारी 1 वाजल्यानंतरही काही दुकानदारांनी दुकानं चालू ठेवली होती. अखेर पोलिसांनी सूचना केल्यानंतर त्यांनी शटर्स ओढून दुकानं बंद केली.
चीकन-मटन खरेदीसाठी रांगा
रविवार हा चीकन-मटन खवय्यांचा हक्काचा दिवस. त्यामुळे म्हापसा, पर्वरी, मेरशी आदी ठिकाणी चिकनविक्री करणार्या दुकानांसमोर सकाळपासूनच ग्राहकांची लगबग दिसून आली. अनेक ठिकाणी लोकांनी रांगा लावून चीकन-मटनची खरेदी केली. म्हापसा मार्केटमध्ये शनिवारीही मांसाहारप्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.