जे. पी. नड्डा यांनी घेतले स्वामी ब्रह्मेशानंद यांचे आशीर्वाद

स्वामींचे आमच्या पक्षावरील आशीर्वाद कायम राहावेत : नड्डा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : तपोभूमीचे पीठाधीश तथा शांतीदूत सदगुरु श्री ब्रह्मेशानंद महाराज यांचे धार्मिक आणि सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. गोव्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे कार्य अतुलनीय आहे, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले. श्रीक्षेत्र तपोभूमी कुंडई येथे सदगुरु श्री ब्रहमानंद महाराज यांच्या समाधीचे दर्शन आणि सदगुरु श्री ब्रह्मेशानंद महाराज यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट – तानावडे, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, पक्षाचे गोवा प्रभारी सी टी रवी, सौ. सुलक्षणा सावंत आणि पक्षाचे पदाधिकारी, नेते तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना श्री. नड्डा म्हणाले, तपोभूमीचे संस्थापक सदगुरु श्री ब्रह्मानंद स्वामींच्या समाधीच्या दर्शनाचा लाभ मिळणे हे माझे भाग्य समजतो. गोव्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात तपोभूमीचे कार्य मोलाचे आहे. धार्मिक शिक्षणासह अन्य शिक्षणातही तपोभूमीचे काम उल्लेखनीय आहे. सद्गुरू श्री ब्रह्ममेशानंद महाराजांचे आशीर्वाद नेहमी भाजपला मिळत आल्याची माहिती मला मिळाली. ही अत्यंत आनंदाची बाब असून स्वामींचे आमच्या पक्षावरील हे आशीर्वाद कायम राहावेत, असे आवाहन श्री. नड्डा यांनी यावेळी केले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वागत केले. तसेच तपोभूमीचे गोव्यातील अनमोल कार्याची माहिती दिली. सदगुरु स्वामींचा भाजपला आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना नेहमीच आशीर्वाद लाभत असल्याचे सांगितले. यापुढेही ते लाभतील, असे ते म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!