RAIN | गोव्यात चार दिवस पावसाची शक्यता

कर्नाटकातील बदलामुळे पावसा अंदाज; लॉकडाऊन काळात भाज्या महागण्याची भीती

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: कर्नाटकात पावसास अनुकूल वातावरण तयार झाल्यानं पुढील चार दिवसांत राज्यातही मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज राज्य हवामान खात्याने वर्तवला आहे. पण, कर्नाटकात मुसळधार पाऊस पडल्यास लॉकडाऊनच्या काळात राज्यातील भाज्यांचे दर वाढून त्याचा मोठा फटका पुन्हा एकदा सर्वसामान्यांना बसण्याची शक्यता आहे.

पुढील काही दिवस राज्यात ढगाळ वातावरण

हवामानातील बदलांमुळे कर्नाटकात पावसास अनुकूल वातावरण तयार झालं आहे. त्याचा गोव्यावरही प्रभाव पडून आगामी चार दिवस कर्नाटकसह गोव्यातही मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने गुरुवारी वर्तवला. गेल्या तीन-चार दिवसांत राज्यात काही ठिकाणी तुरळक, तर काही भागांत मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला आहे. कर्नाटकातील बदलामुळे राज्यात पुढील काही दिवस ढगाळ वातावरण असेल, असेही खात्याने म्हटले आहे.

लॉकडाऊन काळात भाज्या महागण्याची भीती

दरम्यान, राज्य सरकारने गुरुवारी रात्री ९ ते सोमवारी पहाटे ६ पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लॉकडाऊन असला तरी जीवनावश्यक वस्तूंची दुकानं खुली ठेवण्यात येणार आहेत. पण, गोव्याला ज्या कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला पुरवठा होतो, तेथे पावसाचे प्रमाण वाढल्यास त्याचा परिणाम भाजीपाला पुरवठा तसंच दरांवर होऊन गोमंतकीयांचं आर्थिक गणित पुन्हा एकदा बिघडू शकतं. राज्यात करोनाचा वेगाने प्रसार होत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारने अवघे तीन दिवस अंशत: लॉकडाऊन जारी केला असला तरी भविष्यात लॉकडाऊनमध्ये वाढही होऊ शकते. राज्याला भाजीपाला पुरवणाऱ्या कर्नाटक, महाराष्ट्रातही सध्या लॉकडाऊन आहे. त्यात वाढ करण्याचे संकेत तेथील सरकारांनी दिले आहेत. पण तेथून अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू असल्याने गोव्याला पुरेशा प्रमाणात भाजीपाला मिळत आहे. परंतु, करोना प्रसार आवाक्याबाहेर गेल्यास या राज्यांकडून अत्यावश्यक सेवांच्या वाहतुकीवरही निर्बंध येऊ शकतात. त्यामुळे गोव्यातील सर्वसामान्य जनतेत चिंतेचे वातावरण पसरले आहे.

पाऊस पडल्यास परिणाम शक्य : फळदेसाई

सद्यस्थितीत कर्नाटकातून गोव्यात समाधानकारक भाजीपाला येत आहे. बेळगावमधील मार्केटमध्ये गर्दी होत असल्याने मार्केटातील काही पुरवठादारांना शनिवार आणि रविवारी इतरत्र हलविण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन दिवशी तेथून भाजीपाल्याचा पुरवठा होणार नाही. हे लक्षात घेऊनच आम्ही तेथून दुप्पट म्हणजेच सुमारे 200 टन भाजीपाल्याची खरेदी केली असून, तो शुक्रवारी सकाळी गोव्यात येईल, अशी माहिती फलोत्पादन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संदीप फळदेसाई यांनी दिली. कर्नाटकात आगामी काळात पाऊस पडल्यास त्याचा पुरवठा तसेच दरांवर निश्चित परिणाम होईल, असेही त्यांनी नमूद केले

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!