१८ वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाला होऊ शकतो उशीर?

मुख्यमंत्र्यांची माहिती; सहकार्याचं आवाहन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: सिरम इन्स्टिट्यूट कंपनीकडून लसीचे डोस मिळाल्यानंतर १८ ते ४५ वर्षे वयोगटातील व्यक्तींचं लसीकरण केलं जाईल. गोवा सरकारने ५ लाख कोविड लसींची मागणी दिली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

800x450 cm govt servent

लसी वेळेत मिळाल्यास 1 मे पासून लसीकरण

करोनाची स्थिती आणि कोविड लसीकरण मोहिमेविषयी मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी निवेदन प्रसिद्धीस दिलं. १८ ते ४५ वर्षे वयोगटातील लोकांना लस देण्याची मोहीम १ मेपासून देशभरात सुरू होणार आहे. गोव्यातही ही मोहीम १ मेपासून सुरू होईल. सिरम इन्स्टिट्यूटकडून लसींचे डोस मिळण्यास विलंब झाल्यास ही मोहीम सुरू होण्यास विलंब होऊ शकतो.

लसीकरणाची मोहीम गावागावांत

राज्यात लसीकरणाचे तीन टप्पे पार पडले आहेत. पहिल्या टप्प्यात आरोग्य आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस दिली. दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात आली. तिसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील व्यक्तींना लस दिली जात आहे. तीन टप्प्यांसाठी राज्याला ४.३ लाख लसी मिळाल्या. अडीच लाख लोकांनी पहिला डोस घेतला, तर ६८ हजार लोकांनी दोन्ही डोस घेतले. राज्याकडे सध्या १ लाख १० हजार डोस आहेत. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी आणि नागरिकांना लस देण्याचं चांगलं नियोजन झालं. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी उत्तम सहकार्य केलं. पंतप्रधानांच्या आवाहनानुसार राज्यात ‘टीका उत्सव’ही झाला. लसीकरणाची मोहीम गावागावांत पोहोचली.

आता राज्याची जबाबदारी

आता १८ ते ४५ वर्षे वयोगटातील व्यक्तींना लस देण्याची मोहीम सुरू होणार आहे. या मोहिमेच्या नियोजनाची जबाबदारी राज्यांवर आहे. लस अधिकाधिक प्रमाणात उपलब्ध करण्यासाठी उत्पादक कंपन्या प्रयत्न करत आहेत. आता तिसरी लसही लवकरच येणार आहे. लस खरेदी करून ती देण्याची मोहीम सुरू करण्याची जबाबदारी राज्यांची आहे. सरकार लसीकरणाच्या मोहिमेचं नियोजन करत आहे. लोकांनी सहकार्य करावं, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!